मुंबई | Mumbai
राज्य सरकारकडून आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा नाव नसल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा खुलासा केला आहे.
सद्यस्थितीमध्ये मला कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली जाऊ नये. अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे मी स्वतः केली होती अशी माहिती त्यांनी दिली आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच त्यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया काय?
“बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे. बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो. सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत दिली आहे.