Friday, May 3, 2024
Homeनगरडाळिंब उत्पादकांच्या विम्यासाठी प्रयत्न करणार

डाळिंब उत्पादकांच्या विम्यासाठी प्रयत्न करणार

तिसगाव (वार्ताहर) – मागील वर्षी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी मृग बहार फळपीक विम्याची रक्कम संबंधित कंपनीकडे भरलेली होती. शेतकर्‍यांना संबंधित विमा कंपन्यांकडून विम्याची रक्कम मिळवून देण्याचे आश्‍वासन राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे.

पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर आलेले राज्यमंत्री तनपुरे यांची तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी यांच्यासह अरुण वाबळे, मधुकर म्हस्के, सरपंच अमोल वाघ, राजू शेख, बापू देशमुख यांच्यासह शेतकर्‍यांनी भेट घेऊन मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांनी फळपीक विमा देखील उतरवला होता. मात्र, जवळपास वर्ष उलटत आले असून संबंधित विमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना विम्याची रक्कम देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

इतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना डाळिंब फळ पीक विम्याची रक्कम देण्यात आलेली आहे. सुमारे 50 हजार रुपये हेक्टरी प्रमाणे ही रक्कम देण्यात आली असल्याची माहिती काही शेतकरी सांगत आहेत. परंतु जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी या पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत. त्यांना या विम्याचा लाभ व्हावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी राज्य मंत्री तनपुरे यांच्याकडे केली.

यावेळी मंत्री तनपुरे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी फोनवरून चर्चा करून 30 जूनपर्यंत डाळिंब फळ पीक विमा धारक शेतकर्‍यांना विम्याचे पैसे देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब उत्पादक शेतकरी असून करंजी, मिरी, तिसगाव, मढी, निवडूंगे, जवखेडे, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, सातवड, घाटशिरस, दगडवाडी भोसे, वैजूबाभुळगांव येथील अनेक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्या शेतकर्‍यांनी विमा उतरवला मागील वर्षी त्यांना निश्‍चितच याचा मोबदला मिळण्याची शक्यता राज्यमंत्री तनपुरे यांच्या पाठपुराव्यामुळे आता निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या