मुंबई | Mumbai
राज्यातील विविध शहरांमध्ये कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून राजकीय वातवरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्यात महार वतनाची सुमारे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी केल्याचा आरोप झाला होता. यानंतर आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमध्ये २०० कोटींची जमीन ३ कोटी रुपयांना लाटल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी जमीन खरेदी प्रकरणी आरोप केल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, “मी ३ कोटी रुपयांत घेतलेली जमीन कुठे आहे, हे पाहण्यासाठी मी सकाळी लवकर आलो आहे. मलाच माहिती नाही की, मी कुठे जमीन घेतली आहे. जमिनीची किंमत २०० कोटी रुपये आहे. त्यामुळे मी सुद्धा आनंदी झालो आहे. कारण इतक्या स्वस्तात जमीन मिळाली म्हटल्यावर त्याची पाहणी करणे गरजेचे आहे.”
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, “ठीक आहे, मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे इतके गंभीर आरोप झाल्यानंतर जनतेला स्पष्टीकरण देणे माझे काम आहे. विजय वडेट्टीवार आज याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. त्यानंतर मी प्रत्युत्तर देईन. पण सध्या तरी अशा प्रकारची कुठली जमीन माझ्याकडे आहे हे मला माहित नाही. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. त्यामुळे पुरावे देणे त्यांचे काम आहे. त्यानंतर मी यावर खुलासा करेन.”
वेडट्टीवारांनी काय आरोप केला आहे?
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर जमीन लाटल्याचे आरोप करताना म्हटले की, “मंत्री सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी मोक्याच्या ठिकाणी ४ एकर जमीन, ज्याचे बाजारमूल्य ४०० कोटी रुपये आहे, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. तुम्ही महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




