मुंबई | Mumbai
मिरा-भाईंदर (Mira Bhayandar) येथे अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला उत्तर म्हणून मनसे, शिवसेना (उबाठा), मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र या मोर्चाआधी मध्यरात्री मनसेच्या मुख्य नेत्यांना नोटीस पाठवत अटक करण्यात आली आहे. मात्र तरीसुद्धा मोर्चाच्या ठिकाणी मनसे नेत्यांसह सर्वसामान्यांना अटक करण्यात येत आहे. पोलिसांनी (Police) आंदोलनस्थळावरून जे कोणी येईल त्यांना गाड्यांमधून भरून घेऊन जात आहेत. मराठी माणसांच्या मोर्चाला का परवानगी दिली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे मीरा रोडमधील ओम शांती परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
मीरा भाईंदरमध्ये मनसे (MNS Mira Bhayandar Morcha) आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चाची हाक दिली होती. आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाआधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा जारी केल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता पोलीसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले. तर वसई विरारमधीलही अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेने घेतला आहे.
सध्या मीरा-भाईंदरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे म्हणत सरकारला घेरलं आहे. ते म्हणाले की,”पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी (Police) कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत, असेही प्रताप सरनाईकांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “व्यापार्यांना मोर्चा (Morcha) काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. पोलीसांची भूमिका अत्यंत चुकीची आहे. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले. तसेच मीरा रोडमध्ये जे सुरु आहे ते अत्यंत चुकीचं आहे. याविषयी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणार आहे”, असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.





