नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) सुरू केलेल्या ‘मोबाईल ट्रेस स्पेशल युनिट’ (एमटीएसयू) या विशेष पथकाने सामान्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले आहे. तांत्रिक कौशल्याच्या बळावर या पथकाने अवघ्या नऊ महिन्यांत तब्बल सव्वातीन कोटींहून अधिक किमतीचे जवळपास दोन हजार मोबाईल (Mobile) शोधून काढत ते मूळ मालकांच्या हातात सुपूर्द केले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हे पथक आता कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
मोबाईल हरवणे ही आजच्या काळात केवळ एका वस्तूची हानी नसून, त्यासोबत संपर्क, महत्त्वाचा डेटा आणि आठवणी गमावण्याचे टेन्शन असते. मात्र, हरवलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची शक्यता आता वाढली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या संकल्पनेतून जुलै २०२५ रोजी गुन्हेशाखेअंतर्गत या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. यात ‘टेक्निकल ॲनॅलिसिस विंग’चे (टीएडब्ल्यू) ८ आणि वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील २४ अंमलदारांचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके या पथकाचे प्रमुख असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जया तारडे या तांत्रिक बाबींचे निरीक्षण पाहत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात तब्बल ८५८ मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले, तेव्हा अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
आशाच सोडली होती!
मोबाईल हरवल्यामुळे संपर्क तुटल्याने चिंतातूर झालेल्या एका आजोबांना जेव्हा पोलिसांनी त्यांचा हरवलेला मोबाईल परत केला, तेव्हा त्यांना आनंद अनावर झाला. “मोबाईल पुन्हा मिळेल ही आशाच आम्ही सोडली होती,” अशा शब्दांत भावना व्यक्त करत त्यांनी आयुक्तालयासह संपूर्ण एमटीएसयू पथकाचे कौतुक केले.
मुद्दे
‘एमटीएसयू’ पथक स्थापन
नऊ महिन्यांत दोन हजार मोबाईल परत
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यशस्वी शोध
पथक कायमस्वरूपी कार्यान्वित राहणार
विशेष कामगिरीचा टप्पा
दिनांक गहाळ मोबाईल एकूण किंमत (रुपये)
१८ सप्टेंबर २०२५: ६०३ १ कोटी १३ लाख
८ जानेवारी २०२६: ५३५ १ कोटी २ लाख
२४ जुलै २०२६ ८५८ १ कोटी ३३ लाख ८९ हजार
एकूण १,९९६ ३ कोटी ४८ लाख ८९ हजार




