सोलापूर | Solapur
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. उद्धव ठाकरेंनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या कलहावर पडदा पडणार का? असा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. राजकारणात कोणीही एकत्र आले तर चांगलेच आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे हे कुठल्याही अटी-शर्ती मानणारे नाहीत, असे म्हणत हे एकत्रिकरण शक्य नसल्याचे सूचवले आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
मंत्री उदय सामंत सोलापूरमध्ये माढा येथे कार्यक्रमावेळी म्हणाले की, ‘मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना झुकवून युती होईल असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अटींमुळे ठाकरे बंधूंची युती होणे अशक्य आहे’, असे उदय सामंत यांनी स्पष्ट सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘कुणाबरोबर जेवायचे नाही, कुणाबरोबर बोलायचे नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊ नये. पंतप्रधान मोदी -शाह यांचे फोटो लावू नयेत. अशा कोणत्याही अटी उद्धव ठाकरे घालतात. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांना झुकवून युती होणे शक्य वाटत नाही, असे उदय सामंत म्हणाले.
राज ठाकरे यांच्या मनसे नेत्यांना सुचना
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या प्रश्नाबाबत २९ तारखेपर्यंत बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे सध्या परदेशात आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीचा विषय संवेदनशील आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, अशा सूचना राज ठाकरेंकडून मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा