Thursday, May 2, 2024
Homeनगरअतिरिक्त साखरेसह अन्य प्रश्नांवर अन्न मंत्रालयाने बोलावली बैठक

अतिरिक्त साखरेसह अन्य प्रश्नांवर अन्न मंत्रालयाने बोलावली बैठक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आतापर्यंत देशपातळीवर 149 साखर कारखान्यांचा हंगाम सुरु झालेला आहे. गेल्यावर्षी या काळात फक्त 39 कारखाने सुरु होते.

- Advertisement -

यंदा आतापर्यंत उसाचे 54 लाख 61 हजार टन गाळप झाले असून ते गतवर्षीच्या आजच्या गाळपापेक्षा 41 लाख 75 हजार टनाने अधिक आहे. साखरेचे आजतागायत झालेले 4 लाख 25 हजार टनाचे उत्पादन हे देखील गतवर्षीच्या या तारखेच्या उत्पादनापेक्षा 3 लाख 20 हजार टनाने अधिक आहे. यामुळे देश पातळीवर तयार होणारी अतिरिक्त साखर आणि अन्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात केंद्राच्या अन्न मंत्रालयाने बैठक बोलावली आहे. यावेळी सहकारी व खाजगी साखर उद्योगातील प्रमुख ते व्यक्तींबरोबर संवाद साधणार आहे.

आतापर्यंत देशपातळीवर गाळप झालेल्या साखरेचा उतारा 7.82 टक्के असून तो गतवर्षीच्या या तारखेच्या साखर उतार्‍यापेक्षा 0.38 टक्क्यांनी कमी आहे. देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून 61 कारखान्यांमध्ये गाळप सुरु झाले आहे. त्यातून 6 नोव्हेंबरअखेर 23 लाख 57 हजार टन उसाच्या गाळपातून सरासरी 7 टक्के ऊतार्‍याने नव्या साखरेचे 1 लाख 65 हजार टन इतके उत्पादन झाले आहे. हंगामअखेर महाराष्ट्रातून इथेनॉलसाठी वळविण्यात आलेल्या साखरेची अंदाजित मात्रा लक्षात घेता निव्वळ साखरेचे 95 लाख टन उत्पादन अपेक्षित आहे, जे गेल्या वर्षीच्या 61 लाख 71 हजार टनापेक्षा 33 लाख 30 हजार टनाने वाढण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकाने 18 कारखाने, 15 लाख 61 हजार टन ऊस गाळप व सरासरी 8.65 टक्के उतारा असून 1 लाख 35 हजार टन नवे साखरेचे उत्पादन केले आहे. हंगामाअखेर कर्नाटकातून 43 लाख टनाचे नवे साखर उत्पादन होण्याचा अंदाज असून ते गतवर्षीच्या 35 लाख टनापेक्षा 8 लाख टनाने ज्यास्त अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील 50 कारखान्यातून गाळप सुरु झाले असून त्याद्वारे 9 लाख 41 हजार टनाचे ऊस गाळप व सरासरी 8.50 टक्के उतार्‍याने 80 हजार टनाचे नवे साखर उत्पादन झाले आहे. हंगामअखेर 123 लाख टन नवे साखर उत्पादन अपेक्षित असून ते गतवर्षीच्या 126 लाख 35 हजार टनाच्या तुलनेत 3 लाख 35 हजार टनाने कमी असल्याचे अंदाज आहे.

हंगाम सुरुवातीची 107 लाख 18 हजार टनाची शिल्लक व त्यात नव्या 311 लाख टनाची भर पडल्यानंतर एकूण उपलब्धता विक्रमी 418 लाख 18 हजार टनाच्या पातळीवर जाते व त्यातून जरी स्थानिक खप 260 लाख टन होणार असला तरी किमान 50 ते 60 लाख टनाची निर्यात होणे अत्यंत निकडीचे आहे व त्यादृष्टीने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने संबंधित मंत्रालयाशी या संबंधी पाठपुरावा ठेवला आहे.

सध्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार पियुष गोयल यांनी पुढील आठवड्यात देशभरातील सहकारी व खाजगी साखर उद्योगातील प्रमुख व्यक्तींबरोबर संवाद साधण्याचे व त्याद्वारे या उद्योगाला भेडसावणार्‍या प्रश्नांची माहिती घेऊन त्या आधारे साखर उद्योगाला दिलासा देणारे निर्णय करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या