अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जीवे मारण्याची धमकी देऊन 17 वर्षीय अल्पवयीन मेहुणीवर दाजीने वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपातही केला. नगर शहरात राहणार्या पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या दाजीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, बळजबरीने गर्भपात, पोस्को आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडिताने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 9 मे 2023 रोजी बहिणीच्या डिलिव्हरी करता मी आणि माझी आई मनपाच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात गेलो होतो. रात्री साडेआठच्या सुमारास तेथे दाजी दारू पिऊन आले व मला जिन्या जवळ असलेल्या बोळीत घेऊन गेले. तेथे त्यांनी बळजबरीने शारीरिक संबंध केले तसेच कोणाला काही सांगितले तर मला आणि माझ्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दोन महिन्यांनी मासिक पाळी न आल्याने त्याने मला गोळ्या आणून त्या खायला दिल्याने गर्भपात झाला. त्यानंतर 27 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीच्या वेळी दाजीने बहिणीला मारहाण केली.
माझी आई आणि बहीण तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता, दाजी दारू पिऊन घरी आले. त्यांनी दोन वेळा बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर 24 जुलै 2024 रोजी सकाळी दहा वाजता दाजी म्हणाले की, आपण माझ्या गावी जाऊ, आम्ही दोघे दुचाकीवर बसून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने शेंडी (ता. नगर) येथे गेलो. तुमचे गाव कुठे आहे असे त्याला विचारले असता त्याने दुचाकी डोंगराच्या कडेला उभी केली. माझे हातपाय बांधून बळजबरीने शारीरिक संबंध केले. कोणाला काही सांगितले तर मारून टाकीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.