Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबेपत्ता तरुण सापडला त्याच्याच घरात!

बेपत्ता तरुण सापडला त्याच्याच घरात!

कळवण | प्रतिनिधी Kalwan

- Advertisement -

कळवण खुर्द येथून बेपत्ता झालेल्या शेतमजूर विठोबा गुलाब पवार याला शोधण्यासाठी आंदोलकांना दिलेले आश्वासन कळवण पोलिसांनी पूर्ण केले असून कळवण खुर्द येथील त्याच्या राहत्या घरातूनच त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

YouTube video player

दरम्यान बेपत्ता विठोबा याची पोलीस यंत्रणा कसून चौकशी करत असून अनेक रहस्यमय घडामोडी, घटनमागील सूत्रधार याचा शोध आता लागणार आहे. पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेक प्रकरणी 35 पेक्षा अधिक व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारपासून कळवण खुर्द येथून विठोबा पवार हा बेपत्ता झाल्याने त्याचे अपहरण केल्याचा आरोप नातेवाईक व आदिवासी बांधवानी करुन शुक्रवार (ता 3)रात्री व शनिवारी(ता 4) रोजी ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनास हिंसक वळण लागून पोलीस स्टेशनवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. कळवण खुर्द येथील शेतकऱ्यांवर अपहरण व अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी पोलिसांनी बेपत्ता विठोबा पवार याचा लवकरात लवकर शोध घेण्याचे आश्वासन आंदोलकांना पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी दिले होते. बेपत्ता विठोबाच्या शोधासाठी पोलीस उप अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर यांनी तपासाला गती देत 5 पथके वेगवेगळ्या भागात तैनात करुन तपासाला गती दिली.

कळवण खुर्द परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर तो बाहेर कुठे गेला नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणेने जास्तीत जास्त लक्ष कळवण खुर्द परिसरात केंद्रीत करुन घरे, मक्याचे शेतात नदी नाल्यामध्ये व इतरत्र शोध घेतला. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय सूत्रानुसार बेपत्ता विठोबा पवार हा त्याच्या घरातच असल्याची माहिती मिळाली.त्याच्या घराची पोलीस पथकाने तपासणी केली असता तो घरात आढळून आला असून त्यांची प्रकृती ठिक असल्याचे पोलिस उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान या घटनेमागील मुख्य सूत्रधार कोण आहे यासाठी पोलीस कसून चौकशी करत असून तपासात निष्पन्न होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. बेपत्ता विठोबा याला शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे कळवण शहर व परिसरात समजताच शेतकरी बांधवानी कळवण पोलीसस्टेशन समोर गर्दी केली.संबंधित शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून त्याच्यावरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेपत्ता विठोबा याला शोधण्यासाठी पोलीस उप अधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे, योगिता कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे, सुभाष शेवाळे बीट अंमलदार निलेश शेवाळे, प्रशांत तिडके,पप्पू महाले यांच्या पथकाला यश आले.

ताज्या बातम्या