श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील नॉर्दन ब्रँचवरील पाटबंधारे विभागाच्या जागेतील हनुमान मंदिरामागे असलेल्या एका बंद पडक्या घरात गोंधवणी येथील तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. बर्याच दिवसापूर्वी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन महिन्यापासून सदर तरुण बेपत्ता झाला होता. याबाबत शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
महेश बाळासाहेब डोरले (वय 22, रा-गोंधवणी) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो बेपत्ता झाल्याबाबत शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. काल श्री गणेश विसर्जनाची घाई सुरु असताना, एक जण त्या ठिकाणी लघुशंकेसाठी गेला असता, तेथे त्याला कुजलेला वास आल्याने त्या खोलीत खिडकीतून झाकून पाहिले असता त्याला कुजलेला मृतदेह दिसला. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पाहिले असता. दरवाजा बाहेरून लावलेला होता.
आतमध्ये एक लाटकलेला दोर होता. त्याने अनेक दिवसापूर्वी सदर तरुणाने आत्महत्या केली असल्यामुळे तो मृतदेह कुजल्याने धड व डोके वेगळे झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी जागेवर पंचनामा करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याने अशा पडक्या घरात जाऊन आत्महत्या का केली याबाबतची चर्चा परिसरात सुरु होती. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.




