Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामिशन नाशिक मनपा : शहर विकासाबरोबर महिला सुरक्षेला प्राधान्य

मिशन नाशिक मनपा : शहर विकासाबरोबर महिला सुरक्षेला प्राधान्य

नाशिक | फारूक पठाण Nashik

महाराष्ट्र नवनिर्माण सेना Maharashtra Navnirman Sena प्रमुख राज ठाकरे यांनी ज्या दिवसापासून पक्षाची स्थापना केली, त्यावेळेपासून पक्ष संघटनेत महिलांना मानाचे स्थान असून आगामी काळात देखील महिला पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोलाची कामगिरी करणार, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील (MNS- Aruna Patil ) यांनी केला आहे. पक्ष संघटन वाढीसाठी महिला पदाधिकारी सतत प्रयत्न करीत आहे व पुढेही करणार, असेही त्यांनी सांगितले.आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशदूतशी बोलताना आज मनसेना महिला शहराध्यक्ष अरुणा पाटील यांयांनी विविध मुद्यांवर प्रखर भूमिका मांडली.

- Advertisement -

प्रश्न – पक्ष संघटनेत महिलांचे स्थान काय आहे व पुढे कसे राहणार?

उत्तर : मनसेना पक्ष संघटनेत महिलांना महत्त्वाचे स्थान आहे.महिलांनी आणखी अधिक संख्येने राजकारणात यावे, अशी आमची भूमिका आहे. तसेच यासाठी आमचे काम देखील सुरू असते. अधिकाधिक महिलांनी घराच्या बाहेर पडून समाजासाठी चांगले काही तरी करावे, यासाठी आमचे काम सुरू असते.

प्रश्न : महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे, तुमचे याबाबत काय म्हणणे आहे?

उत्तर : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत देखील मनसेना महिलांना व युवतींना अधिकाधिक संधी देणार आहे. त्यादृष्टीने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील प्रयत्नशील आहे. महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आम्ही पक्षाच्या वतीने त्यापेक्षा जास्त भागिदारी महिलांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे पाटील यांनी सांगितले. महिला सेनेला पक्षाचे इतर विंगचा देखील मोठी साथ आहे.

प्रश्न : महिलांसाठी आगामी मनपा निवडणुकीत कोणते मुद्दे राहणार?

उत्तर : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत महिला सुरक्षा हा देखील मोठा मुद्दा राहणार आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या शालिनी ठाकरे यांनी पाठपुरावा करुन महिला सुरक्षा कायदा मंजूर झाला आहे. सध्याच्या काळात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले असून अत्याचार करणार्‍याला फाशीची शिक्षा व्हावी, असा कायदा करण्यात आला आहे. महिला दिवस असो की रात्री महिलांना कुठेही त्रास होऊ नये, असे वातावरण निर्माण करण्यासाठी मनसेना काम करणार आहे. महिला सुरक्षित रहायला पाहिजे.

प्रश्न : मनपा प्रचारात मतदारांसमोर कोणते मुद्दे मांडणार?

उत्तर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची नाशिक मनपावर 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात सत्ता होती. त्याकाळात मोठ्या प्रमाणात शहर विकासाची कामे झाली. यामध्ये प्रामुख्याने भव्य असा बॉटनीकल उद्यान, शस्त्र संग्रहालय, मुंबईनाका येथील ट्रॉफिक चिल्ड्रेन पार्क, गोदा पार्क यासह शहरातील उड्डाणपुलाच्या खालील भागात सुशोभीकरण यासह नाशिक शहराचा आगामी तीन पेक्षा जास्त दशकांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी तयार करण्यात आलेली पाईपलाईन व शहरातील चकाचक रिंगरोड आदी विकासकामे या पाच वर्षात झाली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी मनपाला किती तरी महिने कायम आयुक्त मिळालेले नव्हते. तरी राज ठाकरे यांनी शहराच्या विकासात भर घालणारे अनेक प्रकल्प पुर्ण करुन घेतले. हे सर्व कामे करतांना एक रुपयाचा देखील भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर झालेला नाही. 2017 च्या मनपा निवडणुकीत आम्ही केलेली कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी कुठेतरी कमी पडलो होतो, मात्र आता तसे होणार नाही.आगामी मनपा निवडणुकीत जनतेसमोर आमच्या सत्ताकाळातील विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणार. त्याचबरोबर गत पाच वर्षात तसे काम न झाल्याचे देखील जनतेला सांगणार. यासाठी सोशल मिडियाद्वारे देखील जनजागृती करण्यात येणार. त्याचप्रमाणे घरोघरी जाऊन मनसेना काळातील कामे पोहोचवणार आहोत.

प्रश्न : युवती व ज्येष्ठांनां संधी कशी देणार?

उत्तर : राजकारण एकाबाजुने चालत नाही, ज्येष्ठांना राजकारणाचा अनुभव असतो तर युवतींमध्ये काही तरी करायची धडपड असते. यामुळे समतोल राखण्यात येऊन युवतींना आगामी मनपा निवडणुकीत अधिक संधी मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. राजकारणात तरुणांनी यावे, असे पक्षप्रमुख राज ठाकरे नेहमी सांगतात.

प्रश्न : मनपात पुन्हा सत्ता आली तर कसे काम होणार?

उत्तर : 2022 साली नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली तर 2012 ते 17 या सत्ताकाळात शहराचा सर्वांगीण विकास करण्यात आला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शहराचा विकास करण्यात येईल. त्याच प्रमाणे नाशिककरांना अपेक्षित विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नाशिक महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता पुन्हा यावी, यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासह युवा नेते अमित ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर त्याचबरोबर नाशिकमधील सर्व पदाधिकारी यामध्ये जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, ज्येष्ठ नेते प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, वाहतूक आघाडीचे जावेद शेख तसेच सर्व पदाधिकारी व सर्व महाराष्ट्र सैनिक मोठ्या जोमाने काम काम करीत आहे. नाशिक महापालिकेत 2012 ते 2017 काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काम केले आहे, ते नाशिककरांनी पाहिले आहे. तर यानंतरचे 5 वर्ष देखील महापालिकेच्या सत्ताधार्‍यांचे काम नाशिककरांनी पाहिले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळातील कामे घेऊन आगामी महापालिका निवडणुकीत आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, एकही भ्रष्टाचाराचा आरोप न होता आम्ही नाशिकचा चौफेर विकास केला, असा दावा देखील अरुणा पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या