अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
साखर खरेदी- विक्री व्यवहार प्रकरणात इंदौर (मध्यप्रदेश) येथील व्यापार्यांची सुमारे दोन कोटी 61 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मितेश नाहाटा (रा. लोणी व्यंकनाथ, ता. श्रीगोंदा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंदौरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली एअर पोर्टवर ही कारवाई केली. मितेश हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी बाळासाहेब नाहाटा यांचा मुलगा आहे. त्याची नुकतीच जैन समाज आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईमुळे श्रीगोंद्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इंदौर येथील दर्शन एंटरप्राइजेस, राधाकृष्ण ट्रेडर्स, चंचल ट्रेडर्स, श्रीकृष्णा ट्रेडर्स, पी. योगेशचंद अॅण्ड कंपनी, नाकोडा शुगर ब्रोकर, आगम ट्रेडर्स, राजेंद्र कुमार, अजीत कुमार, महावीर किराणा भंडार आदी साखर व्यापार्यांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदौर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मेसर्स भूलेश्वरचे मितेश नाहाटा आणि साजन शुगर प्रा. लि. चे संचालक साजन पाचपुते यांनी साखर देतो म्हणून व्यापार्यांकडून पैसे घेतले होते. परंतु त्यांनी साखर न देता संबंधित व्यापार्यांची फसवणूक केली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदौर गुन्हे शाखेचे पोलीस दोघा संशयितांच्या मागावर होते. त्यांनी मितेशचे लोकेशन काढले असता तो पुणे येथे असल्याचे समोर आले. गुन्हे शाखेचे पोलीस त्याच्या मागावर होते. तो नंतर मुंबई येथून दिल्लीकडे जाणार्या विमानात बसला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा मुंबई ते दिल्ली असा विमानाने पाठलाग केला. दरम्यान, दिल्ली एअरपोर्ट परिसरात मितेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता साथीदार साजन पाचपुते याच्या मदतीने व्यापार्यांना साखर देण्याचे कबूल करून त्यांच्याकडून आगावू पैसे घेतले मात्र साखर दिली नसल्याची कबुली त्याने दिली.