Friday, May 3, 2024
Homeनगरआमदार डॉ. किरण लहामटे अजित दादांसोबत, गायकर समर्थकांचाही दादांना पाठींबा

आमदार डॉ. किरण लहामटे अजित दादांसोबत, गायकर समर्थकांचाही दादांना पाठींबा

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवडीचे स्वागत करीत आपण व आपले सहकारी अजित पवार यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.राष्ट्रवादीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची भूमिका सध्या तरी वेट अँड वॉच अशी असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

राज्यामध्ये आज अचानकपणे नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. या घडामोडीच्या केंद्रस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. त्यामुळे अकोलेचे राष्ट्रवादी चे आमदार डॉ किरण लहामटे काय भूमिका घेतात याकडे तालुक्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते.अखेर डॉ लहामटे यांनी अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट झाले.

मागील वेळी झालेल्या बंडाच्या वेळी आमदार किरण लहामटे यांनी सावध भुमीका घेत शरद पवार यांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला होता.महाविकास आघाडी च्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले होते मात्र रात्रीतुन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लहामटे यांचे नाव वगळून नगर जिल्ह्यातून आपले भाचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना राज्यमंत्री म्हणून संधी दिली होती.त्यामुळे मागील वेळी झालेली चूक आता परवडणारी नाही म्हणून आमदार लहामटे यांनी मोठे पवार यांची साथ सोडत अजित दादांसोबत  जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.मंत्रिमंडळ शपथ विधी प्रसंगी आ लहामटे हे पहिल्या रांगेत बसल्याचे सर्वांनी पाहिले.यासंदर्भात तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली दिसत असून  काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांची “इकडे आड तिकडे विहीर” अशी परिस्थिती झालेली दिसत आहे.

दुसरीकडे पती निधनानंतर स्वतः पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात आपला संपर्क वाढविलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांच्या समर्थकांनी श्रीमती भांगरे यांची  पहिल्या ल भावी महिला आमदार म्हणून सोशल मीडियावर चर्चा सुरू केली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान राज्यातील या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड हे राजूर येथील आपल्या निवासस्थानी तर माजी आमदार वैभवराव पिचड हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काही पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पण आता भाजपमध्ये असणाऱ्या हौशी कार्यकर्त्यांनी अजित दादा पवार यांचेसोबतचा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा पूर्वीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे तर काहींनी आज आपल्यामध्ये या क्षणाला गोपीनाथ मुंढे असायला हवे होते अशी पोस्ट टाकून मुंढे यांनी त्यांचा पुतण्या धनंजय मुंढे भाजप सोडून राष्ट्रवादी मध्ये गेला तेंव्हा त्यांनी शरद पवार यांना उद्देशून काढलेल्या उदगारांची समाज माध्यमात आठवण करून दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या