श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
नगरविकास विभागाच्या दि. 6 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार रहिवाशी प्रयोजनासाठी श्रीरामपूर येथील जलसंपदा विभागाच्या जागेवर असलेले अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत आपण आपल्या स्तरावर तातडीने बैठक घ्यावी व जलसंपदा विभागाने सध्या दिलेल्या नोटिसींना स्थगिती द्यावी, अशी मागणी आ. हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.
श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापार्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आ.हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी ना. विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. निवेदनावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीत जलसंपदा विभागाच्या जागेमध्ये सुमारे 30 ते 40 वर्षांपासून नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच छोटा-मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मात्र जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात दिलेल्या नोटिशीमुळे नागरिक भयभीत झाले आहे. येथील नागरिक रोजंदारीवर काम करणारे असून अतिक्रमण काढल्यास त्यांचे संसार उघड्यावर येणार आहेत. त्यातच सध्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांबरोबरच विद्यार्थीही घाबरले आहेत. तरी याप्रश्नी तातडीने बैठक घ्यावी व जलसंपदा विभागाने सध्या दिलेल्या नोटिशींना स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.




