Saturday, April 11, 2026
HomeनगरAhilyanagar : ड्रग्ज प्रकरणात एलसीबीचे पीआय कबाडींना बडतर्फ करा

Ahilyanagar : ड्रग्ज प्रकरणात एलसीबीचे पीआय कबाडींना बडतर्फ करा

आ. ओगले अधिवेशनात आक्रमक || सिस्टीमच भ्रष्ट असल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची मुद्देमाल कक्षातून चोरी करून विक्री केल्याप्रकरणी फक्त कर्मचारी शामसुंदर गुजर याला बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र, या मुद्देमाल कक्षाची जबाबदारी असलेल्या पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे. या प्रकरणावर श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी अधिवेशनात तीव्र आक्रमक भूमिका घेत पोलीस यंत्रणेवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले.

- Advertisement -

‘फक्त एका कर्मचार्‍याला बळीचा बकरा बनवून चालणार नाही; संपूर्ण सिस्टीमच भ्रष्ट झाली आहे’, असा घणाघात त्यांनी करत कबाडी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. पुणे पोलिसांनी उघड केलेल्या ड्रग्ज प्रकरणात एलसीबी कर्मचारी गुजर याचा सहभाग समोर आल्यानंतर तपास सुरू झाला. श्रीरामपूर येथून जप्त केलेले सुमारे 14 कोटींचे ड्रग्ज एलसीबीच्या ताब्यातील मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आले होते. या कक्षाची जबाबदारी प्रत्यक्षात कर्मचारी गुजरवर असली तरी संपूर्ण नियंत्रण पोलीस निरीक्षक कबाडी यांच्या अखत्यारीत होते. असे असताना, गुजरने या कक्षातूनच ड्रग्जची चोरी करून विक्री केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची चौकशी करून गुजरला तत्काळ बडतर्फ करण्यात आले. मात्र, निरीक्षक कबाडी यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आ. ओगले यांनी संताप व्यक्त करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यांच्याकडे कक्षाची चावी आणि संपूर्ण जबाबदारी होती, त्यांना अद्यापही अभय का दिले जात आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

आ. ओगले म्हणाले की, मागील आठवड्यातच अधिवेशनात ड्रग्जविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी श्रीरामपूरमध्ये नशेची इंजेक्शन्स कुरिअरव्दारे येतात, हे अत्यंत धक्कादायक आहे. श्रीरामपूर मतदारसंघात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे जाळे उघड झाले आहे. पाच कोटी रूपयांचा गांजा, आठ कोटींची सुगंधी सुपारी आणि तब्बल 14 कोटी रूपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होऊनही मूळ साखळीवर प्रभावी कारवाई होत नसल्याने संपूर्ण यंत्रणेवरच संशय निर्माण होत असल्याचे आ. ओगले यांनी स्पष्ट केले. मुद्देमाल कक्षातून जप्त ड्रग्ज विक्री करणे हे केवळ एका कर्मचार्‍याचे कृत्य नसून, यामागे मोठी साखळी आणि संरक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निरीक्षक कबाडी यांना जबाबदार धरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, एलसीबी कर्मचार्‍याने ड्रग्ज विक्री केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, आ. ओगले यांनी केलेल्या निरीक्षकांविषयीच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्या

सुनेत्रा

सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचं...

0
पुणे | Puneनाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमलेल्या एसआयटीला मिळालेल्या तक्रारीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. बीडमधील एका व्यक्तीने एसआयटीला पत्र पाठवून राज्याच्या...