नाशिक | Nashik
विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केल्यामुळे हे आमदार संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तसेच या आमदारांवर काँग्रेसकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांच्याही नावाचा समावेश असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “मी पक्षाशी कुठलीही गद्दारी केली नाही, माझी बदनामी थांबवा” – आमदार खोसकर
अशातच काल खोसकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील (Thane) आनंदाश्रमात जाऊन भेट घेतली. क्रॉस व्होटींगच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून (Congress) खोसकरांवर कारवाईचे संकेत दिले जात असल्याने खोसकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यामुळे आमदार खोसकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.
हे देखील वाचा : “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज” – आ. खोसकरांचा दावा
या भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना आमदार खोसकर म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर काही व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल आहेत. ते हटविण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचा एक अधिकारी याठिकाणी आला असून तो जाणूनबुजून हे अतिक्रमण हटविण्याचे काम करत आहे.त्यामुळे स्थानिकांवर अन्याय केला जात असून यामुळे ३५० कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : “…तर फडणवीसांना अटक करा”; संजय राऊतांची मागणी
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देवमाणूस असून त्यांनी माझे काम लगेच ऐकले. मी लोकसभा, विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले. महायुतीचे (Mahayuti) काम केले नसल्याने मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. मात्र, तरीही त्यांनी माझे काम ऐकले, असे म्हणत आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा