Friday, May 3, 2024
Homeनगरशेतकर्‍यांना मदतीत दुजाभावाच्या तक्रारींचा पाऊस

शेतकर्‍यांना मदतीत दुजाभावाच्या तक्रारींचा पाऊस

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यात दुष्काळाचे संकट उभे ठाकल्याने पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, अपुरा वीज पुरवठा, पाट पाणी, भरीस भर पिक विमा अग्रीम उचल, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, ई पीक पाहणी, नुकसान भरपाई आदी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत दुजाभावाचे कामकाज सुरू असल्याच्या तक्रारींचा पाऊस शेतकरी, विविध गावचे सरपंच व कार्यकर्त्यांकडून पडला.

- Advertisement -

आमदार मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.12) शेवगाव तालुक्याची दुष्काळी आढावा आम बैठक पार पडली. यामध्ये शेतकर्‍यांनी अधिकारयांना धारेवर धरले. यावेळी आ राजळे यांनी शासकीय यंत्रणांच्या सर्व विभागाने संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन समन्वयाने काम करून शेतकरी नागरिकांना दिलासा देणारे काम करण्याच्या सूचना दिल्या.

कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पन्नास मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तालुक्यातील सुमारे 75 हजार शेतकर्‍यांनी पिक विमा लाभासाठी 92 हजार 013 शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले असून 55 हजार 160 हेक्टर क्षेत्रातील कपाशी तूर बाजरी भुईमूग आदी सुमारे 270 कोटी रुपयांची रक्कम आरक्षित केली असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगीतले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पावसात 21 दिवसाचा खंड पडलेल्या तालुक्यातील शेवगाव बोधेगाव व एरंडगाव अशा तीन मंडळात शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात आले असून तालुक्याचा नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. तालुक्यातील चापडगाव, ढोरजळगाव व भातकुडगाव अशा तीन उर्वरित मंडळांचा पिक विमा अग्रीम मदत निधी योजनेत समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

मंडळाच्या एका गावातील पर्जन्यावरून सर्व गावांचा आनेवारीचा अंदाज बांधण्याची पद्धत बदलण्याची मागणी यावेळी करण्यात आली. विविध गावांत नजीकच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या झळा वाढण्याची भीती असल्याने या ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यातील 37 गावात जल जीवन योजनेचे काम सुरू असून त्यास गती देण्याची मागणी करण्यात आली.

प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी अतुल लोहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रल्हाद पाठक, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, ताराचंद लोंढे, भीमराज सागडे, दिनेश लव्हाट, वाय डी कोल्हे, आशा गरड, शिवाजी भिसे, कचरू चोथे, सुरेश आव्हाड, भाऊसाहेब पोटभरे , सुनील सिंह राजपूत यांनी चर्चेत सहभाग घेतला. यांच्या सह गाव गावचे सरपंच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. पंचायत समितीचे कक्ष अधिकारी कल्याण मुटकुळे यांनी सूत्रसंचलन केले.

ई-पीक पाहणीला गती द्या

पिक विम्यासाठी ई पिक पाहणी बंधनकारक आहे. तालुक्यातील 96 हजार शेतकर्‍यांपैकी आज अखेर 36 हजार शेतकर्‍यांनी ई पिक पाहनीची नोंद केली आहे. या उपक्रमास अधिक गती मिळावी यासाठी गाव गावचे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना सूचना देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या