मुंबई | Mumbai
अभिनेत्री कंगना रनौतने काही दिवसापूर्वी मुंबईतील वातावरण पाकिस्तानसारखे झाल्याचे आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्यावरून अनेक क्षेत्रातून तिच्यावर टीका होत आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत, “कंगना रनौत जर मुंबईमध्ये आली तर शिवसेनेच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील.” असे ट्विट केले होते. सरनाईक यांच्या या ट्विटनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सरनाईकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. त्यावर सरनाईकांना ट्विट करत उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे,
“मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.” तसेच त्यांनी भाजपावर देखील टीका केली आहे. त्यांनी म्हंटले आहे, “भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.”