Tuesday, May 7, 2024
Homeराजकीयओबीसीसह भटके विमुक्तांचे स्वतंत्र सर्व्हेक्षण करून तरतूद करावी - आ. राठोड

ओबीसीसह भटके विमुक्तांचे स्वतंत्र सर्व्हेक्षण करून तरतूद करावी – आ. राठोड

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

मुळ व्हीजेएनटी भटके विमुक्त समाजाला कोणत्याही सवलती नसल्यामुळे हा समाज आजही मागे पडला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी त्यांना सवलती द्याव्यात. तसेच आगामी काळात ओबीसींसह भटके विमुक्तांचे सर्व्हेक्षण करून त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतुद करावी, अशी आपली मागणी असल्याची माहिती माजीमंत्री आ.संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

मुळ व्हीजेएनटी समाजासाठी आ. राठोड यांनी राज्यभरात जनसंपर्क दौरा सुरू केला आहे. काल नंदुरबार तर आज धुळ्याला भेट देत त्यांनी बैठक घेतली. त्यानंतर दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. आ. राठोड यांनी सांगितले की, वसई, पालघरपासून या दौर्‍याला सुरूवात केली. दर्‍याखोर्‍यात राहणारा आणि इंग्रजांच्या काळात बंधनांमुळे गावाबाहेर वसलेला हा मुळ व्हीजेएटी समाज आहे.

त्यात प्रामुख्याने बंजारा, नातेजोगी, गोसावी आदींसह 14 जाती, 28 जमातींचा समावेश आहे. या जमाती तेव्हा गावात येण्याचा प्रयत्न करीत होत्या. मात्र तेव्हा बंधणे होती. इंग्रजाच्या काळात त्यांना गुन्हेगारी जमात म्हटले जायचे.

हा समाज गुन्हेगारीपासून प्रवृत्त झाला पाहीजे, त्यांचीही प्रगती व्हावी, यासाठी इंग्रजांनीही प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी 1952 मध्ये सोलापूर येथे 12 जातींना मुक्त केले. मात्र या समाजाला आजही सवलती मिळत नाहीत. त्यामुळे समाज मागे पडला आहे.

हा समाज मोर्चा काढू शकत नाही. संघटीत होवू शकत नाही. आमचा ओबीसी, मराठा, धनगर अशा सर्वांना पाठींबाच आहे. पंरतू आमच्या मागण्याही मान्य व्हाव्यात, आम्हालाही सवलती मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. राठोड पुढे म्हणाले की, पोहरा देवी गडावर रंगारा कार्यक्रमात राज्यातील 10 लाख बंजारा बांधव एकत्र आले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सवलतींची मागणी केली होती. त्यानंतर आता राज्यात आमचे सरकार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्यासोबत बैठकाही झाल्या आहेत. मात्र कोराना हा विषय मागे पडला आहे. त्यामुळे आगामी काळात ओबीसी, भटके विमुक्तांचा स्वतंत्र सर्व्हे करून त्यांच्यासाठी स्वतंत्र तरतुद करावी, अशी आमची मागणी आहे.

पंचायत राज व पदोन्नतीचे आरक्षण देखील कायम ठेवावे. तसेच इंग्रजांनी केलेल्या क्रिमीनल अ‍ॅक्टमधून वगळावे, अशी मागणीही त्यांनी केली. सवलतींसाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना 12 वेळा शिष्ठमंडळासह भेटलो मात्र या सरकारकडून आम्हाला न्याय मिळाला नसल्याचेही आ. राठोड यांनी सांगितले.

यावेळी जनसंपर्क दौर्‍याचे प्रमुख समन्वयक प्रा. सी. के. पवार, प्रा. किशोर राठोड, प्रा. राजेश चव्हाण, सुधीर राठोड, पाडुरंग राठोड, गजानन राठोड, प्रेम चव्हाण, अतूल राठोड, साईदास चव्हाण, डॉ. तुषार राठोड, श्रावण चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या