संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
समाजाच्या विकासात शिक्षकांचा अत्यंत मोलाचा वाटा असून शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना अभिवादन करताना युवा आमदार सत्यजीत तांबे यांनी शाळेत जाऊन पुस्तक, खडू, डस्टरसह सह्याद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व भूमिती हे विषय शिकवले. आमदार सत्यजीत तांबे यांनी इंग्रजी विषय शिकवताना इंग्रजीचे महत्त्व मोठे असून इंग्रजीला घाबरू नका असे सांगताना करिअरसाठी हा विषय प्रत्येकाला आवश्यक आहे. मोठी स्वप्ने पाहा, त्याचबरोबर चांगला अभ्यासही करा. दडपण न घेता हसत खेळत शिका म्हणजे शिक्षण सुद्धा आनंदाचे वाटेल असे सांगितले. सोशल मीडिया आणि मोबाईल पाहण्याचे आपले वय नाही. तर पुस्तके अभ्यासण्याचे हे वय आहे. इंग्रजी ही वाघिणीचे दूध आहे अशी आपली म्हण आहे. परंतु आता या दुधाची प्रत्येक विद्यार्थ्याला गरज आहे. इंग्रजी सोपी आहे तिचा बाऊ करू नका. इंग्रजीला न घाबरता आत्मसात करा असा सल्ला दिला.
नववीच्या विद्यार्थ्यांना भूमिती शिकवताना भूमिती हा जीवनाचा अविभाज्य भाग असून गोल, त्रिकोण, चौकोन हे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहत असतो. गणितामध्ये भूमिती महत्त्वाची आहेच, परंतु जीवनामध्येही ती महत्त्वाची आहे. जगाच्या पाठीवरील सौदी अरेबियामध्ये नव्याने द लाईट नावाचे शहर उभे राहत आहे. 170 किलोमीटर लांब आणि 200 किलोमीटर रुंद अशा या शहरातून जगात कुठेही सहा तासांत आपण पोहोचू शकतो. या शहरामध्ये एक कोटी नागरिक राहू शकतात असे हे शहर तेथे निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात 14 मैलावर भाषा बदलते, आपल्याकडे जेवणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, राहणीमान वेगळे आहे, महाराष्ट्रातच खानदेशी, मराठी, वर्हाडी, कोकणी अशा भाषा आहेत.
मात्र तरीही एकता ही आपली मोठी ताकद आहे असे सांगताना जशी आई आपल्या प्रत्येक मुलाला जीव लावते तसेच प्रत्येक वडील सुद्धा मुलाच्या भविष्यासाठी चिंतीत असतात म्हणून आई-वडील हे दोन्ही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. आई-वडिलांनंतर जे आपल्याला घडवतात त्या शिक्षकांप्रतिही प्रत्येकाने कायम कृतज्ञ राहिले पाहिजे असा मौलिक सल्ला दिला. स्वतः आमदार शिक्षक झाले हे पाहून सर्व विद्यार्थी भारावले. सह्याद्री संस्थेचे सहसचिव दत्तात्रय चासकर यांनी माजी विद्यार्थी व आमदार सत्यजीत तांबे यांचा सत्कार केला.