Tuesday, September 17, 2024
Homeनगरघोगरगावातील वाळू चोरीविरोधात आमदार गडाख आक्रमक

घोगरगावातील वाळू चोरीविरोधात आमदार गडाख आक्रमक

महसूलच्या अधिकार्‍यांना सोबत घेवून वाळूचोरीची ठिकाणे दाखवली

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील बेकायदा वाळू उपसा व अवैध वाहतूक तातडीने बंद करत वाळू उपशाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांना झालेल्या मारहाणीची चौकशी करावी. तसेच याप्रकरणातील दोषीवर त्वरित गुन्हे दाखल करुन कारवाई अशी मागणी निवेदनाद्वारे माजी मंत्री तथा आ. शंकरराव गडाख यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आ. गडाख यांनी अधिकार्‍यासह आपला मोर्चा थेट उपसा आणि चोरी असणार्‍या ठिकाणी वळवला. वाळू उपसा झालेेली ठिकाणे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली.

घोगरगाव ग्रामस्थांवर वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यानंतर शनिवारी आ. गडाख यांच्या नेतृत्वाखाली मोठा जनसमुदाय नेवासा तहसील कार्यालयात पोहचला. सुरूवातीला अधिकार्‍यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने आक्रमक झालेल्या आ. गडाख यांनी अधिकार्‍यांना घेवून थेट घोगरगाव लगतचे नदीपात्र गाठले आणि अधिकार्‍यांना वाळू उपसा होणारे ठिकाण दाखवले. यावर अधिकारी देखील निरूत्तर झाले. घोगरगावमधील वाळू चोरीबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे अर्ज, तक्रार केलेली आहे. मात्र, प्रशासनातील हितचिंतकांमुळे याठिकाणी वाळूतस्कारी करणार्‍यांचे चांगलेच फावलेले आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनातील अनेकांचे वाळूतस्करांशी लागेबांधे असून यामुळे याठिकाणी कारवाई होण्यास विलंब अथवा कारवाई करण्यास टाळाटाळ सुरू आहे.

शुक्रवारी वाळूतस्करीला विरोध करणार्‍या घोगरगावच्या ग्रामस्थांना महसूल व पोलीस कर्मचार्‍यांच्या समक्ष लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी दगडफेक करण्यात येवून यात अनेक ग्रामस्थ जखमी होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे तातडीने या प्रकरणी संबंधीतांचा शोध घेवून गुन्हे दाखल न झाल्यास ग्रामस्थांनी नेवासा तहसीलसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात तसे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

तालुक्याच्या बाहेरचे लोक येऊन माझ्या तालुक्यात दहशत करत आहेत. वाळू तस्करांच्या डंपरमुळे मुलांना शाळेत जाण्यास अडचण येत आहे. विरोध करणार्‍या ग्रामस्थांना मारहाण केली जात आहे. अधिकारी ग्रामस्थांना दाद देत नाहीत. तालुक्यातील जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही. बेकायदा वाळूउपसा दोन दिवसात बंद झाला नाही, तालुक्यातील एकाही नागरिकाच्या केसाला धक्का लागला तर कुणाचीही गय केली जाणार नाही.
– आ. शंकरराव गडाख

विश्वास फक्त गडाखांवर; ग्रामस्थांचा निश्चय
घोगरगावामध्ये गेल्या महिनाभरापासून वाळूतस्करीमुळे व त्यांच्या दहशीतमुळे भीतीचे वातावरण आहे. महसूल व पोलीस अधिकार्‍याकडे अनेकदा तक्रारी करूनही गावकर्‍यांना प्रतिसाद मिळत नाही. आ. गडाख यांनी गावात येऊन गावकर्‍यांना धीर दिला आहे. आता आमचा विश्वास फक्त आ. शंकरराव गडाख यांच्यावरच असल्याचे ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस अधिकार्‍यासमोर सुनावले. यामुळे आ. गडाख यांना घोगरगावातील वाळूतस्करी विरोधात आणि ग्रामस्थांच्या रक्षणासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या