मुंबई । Mumbai
मतदार याद्यांमधील कथित घोळ आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ नंतर आता भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि मनसेमध्ये जोरदार ‘ट्विटर वॉर’ आणि आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. या वादाला आता ‘व्होट जिहाद’ची किनार लाभल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘सत्याचा मोर्चा’ दरम्यान निवडणूक आयोगावर टीका करताना, ‘सगळी कारस्थाने आयोगामार्फत सुरू आहेत, मग आम्ही कशी निवडणूक लढवायची?’ असा सवाल केला होता. तसेच, दुबार मतदारांना ‘फोडून काढा’ असे आवाहन केले होते. ठाकरे यांच्या या भूमिकेवर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र पलटवार केला.
शेलार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनीही आक्रमक भूमिका घेतली. “सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?” असा थेट सवाल करत साटम यांनी काही मतदारसंघांतील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी सोशल मीडियावर शेअर केली. धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-पूर्व या महाराष्ट्रातील पाच मतदारसंघांतील मुस्लिम दुबार मतांची आकडेवारी देत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, तसेच राहुल गांधी यांना टॅग केले.
‘सत्याचा मोर्चा’त राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचा उल्लेख करताना कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी या मतदारसंघांचा विशेष उल्लेख केल्यावर आशिष शेलार यांनी यावर आक्षेप नोंदवला. राज ठाकरेंना फक्त मराठी आणि हिंदू दुबार मतदार दिसतो का? विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मतदार त्यांना दिसले नाहीत का? असा खोचक सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
भाजपच्या ‘व्होट जिहाद’च्या आरोपाला मनसेनेही लगेच प्रत्युत्तर दिले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांचा एक जुना फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला. “खास अशिशुद्दीन यांच्यासाठी अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस घोटाळा” असे कॅप्शन देत त्यांनी इफ्तार पार्टीतील भाजप नेत्यांचा फोटो पोस्ट केला. यासोबतच, त्यांनी अमित साटम यांच्या मतदारसंघातील बोगस मतदारांची यादी देखील जाहीर केली.
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनीही या वादात उडी घेतली. त्यांनी ट्विटरद्वारे भाजप नेते आशिष शेलार यांना निवडणूक आयोगाने आपले अधिकृत प्रवक्ते म्हणून घोषित करावे अशी मागणी केली. “मनसेने मतदार यादी, बोगस मतदार किंवा दुबार मतदार यादीवरुन निवडणूक आयोगावर प्रश्न विचारले की भाजपच्या लोकांना राग येतो, चीड येते. आणि त्यांचे नेते निवडणूक आयोगाची बाजू मांडण्यासाठी पत्रकार परिषदा घेतात,” असे काळे यांनी म्हटले आहे. यावरून भारतीय जनता पक्षाचा खरा जीव मतदार यादीत आहे, हे स्पष्ट दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, मतदार याद्यांमधील कथित घोळाचा मुद्दा आगामी काळातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा वादाचा विषय बनण्याची चिन्हे आहेत.




