मुंबई | Mumbai
दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही. त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला तेच अजून आपल्याला सापडले नाहीत. त्यामुळे देशात मॉक ड्रिल नाही तर कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे, असे सडेतोड मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भारताने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकवर आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, “पहलगामला जो हल्ला झाला, मी त्याच्यावर पहिले टि्वट केलेले. ज्यांनी हल्ला केलाय, त्या अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना कठोरात कठोर पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिलं असा धडा शिकवला पाहिजे. दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुढे ते असे ही म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचे लक्ष भरकटवणे किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा