मुंबई । Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललं आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून आज (सोमवार) या उपोषणाचा चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी आता निर्जळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आजपासून ते पाणीही घेणार नाहीत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदानासह सीएसएमटी व मुंबई महापालिका परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली आहे. या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे हे “कुचक्या कानाचे आणि मानासाठी भूकेले” आहेत, अशा शब्दांत जरांगेंनी हल्ला चढवला होता. फडणवीसांनी राज ठाकरे यांचा पक्ष संपवला, त्यांचा मुलगा निवडणुकीत पराभूत झाला, तरीही ते फडणवीसांसोबत चहा प्यायला जातात, याचे आश्चर्य वाटते, अशी टीकाही जरांगे यांनी केली होती.
राज ठाकरे यांना जेव्हा पत्रकारांनी जरांगे मुंबईत का आले असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील असे सांगितले होते. वाशीतील भेटीत शिंदे यांनी जरांगेंना काय आश्वासन दिले आणि आता ते पुन्हा आंदोलन का करत आहेत, हे शिंदेच सांगू शकतील, असे राज ठाकरेंनी म्हटले होते. त्यावर जरांगे यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर देत आंदोलनाच्या मुद्द्यावरून वातावरण आणखी चिघळवलं.
या साऱ्या घडामोडींमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांनी मात्र आंदोलनकर्त्यांना थेट पाठिंबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून मनसैनिकांना आवाहन करत म्हटलं आहे की, मराठा बांधवांच्या सोयीसाठी अन्न-पाणी पुरवावं, त्यांच्या राहण्याची आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे. माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे.
मनोज जरांगे यांनी निर्जळी उपोषण सुरू केल्याने आंदोलन आणखी उग्र होण्याची चिन्हं आहेत. राज्य सरकारकडून काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सध्या आझाद मैदानात सुरू असलेला संघर्ष राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणखी तापलेला दिसतोय.




