अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहराच्या स्टेशन रोड परिसरात असलेल्या एका मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल खरेदीच्या व्यवहारातून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर विनयभंग व हाणामारीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या प्रकरणात परस्पर विरोधी फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत. या घटनेत 20 वर्षीय युवतीने मोबाईल शॉपीतील व्यक्तीवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर दुसरीकडे, संबंधित दुकानदाराने युवती व तिच्या नातेवाईकांकडून मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
युवतीने मोबाईल शॉपीमधून जुना मोबाईल खरेदी केला होता. मोबाईलमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याने आणि खाते सुरू होत नसल्याने ती रात्रीच्या सुमारास पुन्हा दुकानात गेली. यावेळी दुकानाच्या गल्ल्यावर बसलेला संजूर मल्लुद्दीन आलम शेख (वय 44, रा. रेल्वे स्टेशन परिसर) याने तिच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केली. युवतीने नकार दिला असता त्याने वाईट हेतूने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेच्या जातीचा उल्लेख करत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी शेख विरोधात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, याच घटनेत दुसरी बाजू म्हणून मोबाईल दुकानदार संजूर मलुद्दीन आलम शेख यांनीही कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एका युवतीने त्यांच्याकडून 2 हजार 200 रुपयांना जुना मोबाईल खरेदी केला.
मात्र, संपूर्ण पैसे न देता ती निघून गेली. काही वेळाने ती परत येऊन पैशांवरून वाद घालू लागली. वाद वाढल्यानंतर युवतीने आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी संजूर शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच दुकानातील काचेचा काउंटर व विक्रीसाठी ठेवलेले मोबाईल फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आरडाओरड झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केला. दुकानदाराच्या फिर्यादीवरून संबंधित संशयित आरोपींविरुद्ध मारहाण, बेकायदेशीर प्रवेश व नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





