Sunday, July 26, 2026
HomeनगरAhilyanagar : मूग, बाजरी आणि उडीदाची पेरणी 25 टक्क्यांच्या आत

Ahilyanagar : मूग, बाजरी आणि उडीदाची पेरणी 25 टक्क्यांच्या आत

खरीप हंगामाच्या पेरण्या 54 टक्केच, अकोलेत भातखेचर रिकामीच

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात यंदा जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाल्यानंतरही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. यामुळे खरीप हंगामातील मूग, बाजरी आणि उडिद पिकांची पेरणी अद्याप 20 ते 25 टक्क्यांच्या दरम्यान लटकलेल्या दिसत असून अकोले तालुक्यातील प्रमुख पिक असणार्‍या भात पिकाचे खेचर रिकामेच आहेत. जिल्ह्यातील खरीप हंगामातील एकूण पेरण्या 54 टक्क्यांपर्यंत पोहचल्या असली तर पावसाने ताण दिल्यास त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासून पावसाने हात आखडता घेतलेला दिसत आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या संथ होत्या. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोटासह घाटमाथ्यावर बर्‍यापैकी पाऊस झाला. तर उर्वरित जिल्ह्यात केवळ भिज पाऊस झालेला असून दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली असून उन्हाचा कडाका वाढलेला दिसत आहे. यामुळे पिके सुकण्यास सुरूवात झाली असून पावसाने खंड दिल्यास त्याचा हंगामातील पेरणी झालेल्या आणि नव्याने पेरणी होणार्‍या पिकांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सोयाबीननंतर सर्वाधिक पेरणी होणार्‍या बाजरी पिकाची अवघ्या 19 हजार 433 हेक्टरवर (13 टक्के), मूग पिकाची 9 हजार 826 हेक्टरवर (21 टक्के) आणि उडिद पिकाची 1 हजार 629 हेक्टरवर (22 टक्के) पेरणी झालेली आहे. अकोले तालुक्यात सर्वाधिक भात पिकांची लागवड होत असून आतापर्यंत या ठिकाणी 1 हजार 320 हेक्टरवर अवघी 8 टक्के लागवड झालेली आहे. यामुळे तालुक्यातील डोंगरगाळ भागातील भाताची खेचर रिकामी दिसत आहेत.

आतापर्यंत झालेल्या भिज पावसात मका पिकाची 44 हजार 970 हेक्टरवर, तूरी 47 हजार 612 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची पेरणी ही 3 लाख 11 हजार 239 हेक्टरवर झालेली असून पेरणी टक्केवारी ही 54 टक्के झालेली आहे. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिलेली असून आता पुढील दहा ते पंधरा दिवस पावसाचा खंड राहणार असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यातील खरीप हंगामाचे भवितव्य अडचणीचे होणार आहे.

पिकनिहाय पेरणीचे क्षेत्र
भात 1 हजार 320 हेक्टर (8 टक्के), ज्वारी 59 हेक्टर (10. 4 टक्के), बाजरी 19 हजार 433 हेक्टर (13 टक्के), नाचणी 26. 27 हेक्टर (10.4 टक्के), मका 45 हजार हेक्टर (74 टक्के), तूर 47 हजार 612 हेक्टर (131.29 टक्के), मूग 9 हजार 826 हेक्टर 20.9 हेक्टर, तीळ 27 हेक्टर (19.3 टक्के), कारळे 52.1 हेक्टर (15.6 टक्के), सोयाबीन 56 हजार 350 हेक्टर (66 टक्के) आणि कपाशी 1 लाख 5 हजार 564 हेक्टर (86 टक्के).

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “सेलिब्रेशनसाठी त्यांना कारण मिळाल्याचा मला आनंद”; CM फडणवीसांचा...

0
मुंबई | Mumbai नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी...