अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दोन महिलांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या दोघा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या दोन तासांत पकडत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा छडा लावला. रोहन बाबासाहेब पवार (वय 25, रा. सारोळाबध्दी, ता. अहिल्यानगर), सिमा अंबर पवार (वय 42, रा. एकविरा चौक, सावेडी, अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत.
शुक्रवारी (28 नोव्हेंबर) दरेवाडी (ता. अहिल्यानगर) गावातून विना नंबरच्या कारमधून दोन महिलांचे अपहरण झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने ती तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळवून तातडीने कारवाईचे आदेश दिले. तात्काळ सहायक पोलीस निरीक्षक अनंत सालगुडे यांच्या नेतृत्वाखाली पथक गठित केले आणि शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. पथकाने दरेवाडी व चास परिसरात शोधमोहीम राबवित असताना चास पोलीस चौकीजवळ एक पुरूष आणि एक महिला संशयितरीत्या फिरताना दिसले. पथकाकडे ते पळून जाऊ लागल्याने त्यांच्या हालचालींवर संशय बळावला. पथकाने ताबडतोब पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे रोहन बाबासाहेब पवार आणि सीमा अंबर पवार अशी सांगितली.
सखोल चौकशीत त्यांनी अपहरण केलेल्या दोन्ही महिलांना अरणगाव शिवारातील मेहेरबाबा ट्रस्टजवळील जंगलात सोडून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयित आरोपींना घेऊन जंगल परिसरात शोध घेतला असता आदिती प्रवीण ढेपे (22) आणि तिची आई सुरेखा प्रवीण ढेपे (43, रा. चेतना कॉलनी, नवनागापुर) या दोघी आढळल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती ढेपे हिने तिचे पती ऋषीकेश दिलीप मोरे याला घटस्फोटाची नोटीस दिल्यामुळे संशयित आरोपींनी त्यांचे अपहरण करून गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.
या प्रकरणी फिर्यादी अदिती ढेपे यांच्या फिर्यादीवरून रोहन बाबासाहेब पवार, सीमा अंबर पवार व ऋषीकेश दिलीप मोरे (रा. सम्राटनगर, चेतना कॉलनी, एमआयडीसी) यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर करीत आहेत.




