Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रआईच्या मृतदेहाशेजारी दीड वर्षांचे बालक होते दोन दिवस उपाशी बसून

आईच्या मृतदेहाशेजारी दीड वर्षांचे बालक होते दोन दिवस उपाशी बसून

पुणे |प्रतिनिधी| Pune

करोनाच्या उद्रेकाने सर्वांनाच धडकी भरली आहे. या संकटाच्या काळात अनेकदा कोणाला मदत पाहिजे असली तरी ती कोणी करण्यास धजावत नसल्याच्या आणि करोनाच्या भीतीने माणुसकीला काळे फासणाऱ्या घटना दररोज घडत आहे. पिंपरी-चिंचवड भागात अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथे आईच्या मृतदेहाशेजारी एक दीड वर्षाचा मुलगा दोन दिवस उपाशीच बसून होता. मात्र, या महिलेला करोना असण्याच्या भीतीने कोणीही या मुलाजवळ फिरकले नाही.

- Advertisement -

सरस्वती राजेशकुमार (वय 29, रा. फुगेवस्ती, दिघी. मूळ रा. उत्तरप्रदेश) मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सरस्वती या आपल्या पतीसह कामासाठी भोसरी येथे आल्या होत्या. मात्र, गावाकडे निवडणुका असल्याने पती महिनाभरापूर्वी गावी गेला होता. तेव्हापासून सरस्वती आपल्या मुलाला घेऊन फुगेवस्ती येथे राहत होत्या.

फुगेवस्ती येथे एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिघी पोलिसांना नागरिकांनी दिली. त्यानुसार दिघी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घर आतून कडी लावून बंद असल्याचे दिसून आले. खिडकीमधून गजाच्या साहाय्याने दरवाजाची कडी काढली. त्यावेळी घरामध्ये सरस्वती या मृतावस्थेत दिसून आल्या. आईच्या मृतदेहाशेजारी अवघ्या दिड वर्षांचा मुलगा निपचित पडून होता.

मुलगा अन्न-पाण्यावाचून व्याकूळ होता. यामुळे शेजारील महिलेला सांभाळ करण्याची विनंती पोलिसांनी केली. मात्र ,या महिलेला करोना झाला असावा या भीतीने कोणीही पुढे आले नाही. अखेर सुशीला गबाले आणि रेखा वाजे या दोन महिला पोलिसांनी या मुलाला जवळ घेतले. त्याला दूध आणि बिस्किट दिलं. त्यानंतर या मुलाला शिशूगृहात दाखल केलं. सध्या या मुलाची प्रकृती ठिक आहे. महिलेचा पती अजूनही उत्तर प्रदेशातून आलेला नाही. मात्र, दोन दिवस उपाशी असलेल्या मुलाला कोणीही जवळ न घेतल्याने एकच संताप व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या