दिल्ली | वृत्तसंस्था Delhi
भारत आणि ब्राझील यांनी टपाल क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. टपाल सेवा, डिजिटल रूपांतरण आणि सर्वसमावेशक सेवा वितरण या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने हा करार निर्णायक पाऊल मानला जात आहे.
भारत सरकारचे दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे आणि ब्राझीलचे दळणवळण मंत्री फ्रेडेरिको दे सिक्वेरा फिल्हो यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान हा करार औपचारिक करण्यात आला.
या कराराद्वारे भारताचा टपाल विभाग आणि ब्राझीलचे दळणवळण मंत्रालय यांच्यात धोरणात्मक भागीदारी व ज्ञान देवाणघेवाणीसाठी व्यापक सहकार्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण, सार्वत्रिक सेवा बळकटीकरण, पत्ता प्रणाली सुधारणा, डिजिटल रूपांतरण, ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स आणि टपाल वित्तीय सेवांमध्ये सहकार्य यावर विशेष भर देण्यात आला आहे.
याशिवाय क्षमता विकास, प्रशिक्षण, तांत्रिक देवाणघेवाण, संयुक्त उपक्रम आणि धोरणात्मक प्रकल्प राबविणे यावरही दोन्ही देश सहकार्य करतील. जागतिक टपाल संघ (यूपीयू)सारख्या बहुपक्षीय मंचांवर अधिक समन्वय साधण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
हा करार पाच वर्षांसाठी लागू राहणार असून स्वयंचलित नूतनीकरणाची तरतूद आहे. टपाल प्रणालीचे आधुनिकीकरण, आर्थिक विकास आणि वित्तीय समावेशन साध्य करण्यासाठी दोन्ही देशांच्या नेटवर्कचा प्रभावी वापर करण्याच्या सामायिक बांधिलकीचे तो प्रतीक आहे. भारत–ब्राझील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.





