उदयपूर । Udaipur
भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य प्रदेशातून समोर आला आहे. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या केवळ एका अफवेमुळे निर्माण झालेल्या गोंधळात चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे.
धावत्या रेल्वेतून खाली उतरून शेजारच्या रुळावर गेलेल्या प्रवाशांना समोरून येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेसने धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला आणि एका निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मुरैना जिल्ह्यातील हेतमपूर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी संध्याकाळी घडला.
उत्तर मध्य रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास झाशी विभागातील हेतमपूर-धौलपूर रेल्वे मार्गावरून गाडी क्रमांक १९६६५ खजुराहो-उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस धावत होती. याच दरम्यान रेल्वेच्या जनरल डब्यातील एका प्रवाशाने अचानक अलार्म चेन (साखळी) ओढली. रेल्वे अचानक थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यातच डब्यात आग लागल्याची अफवा वेगाने पसरली. जीव वाचवण्याच्या आकांताने प्रवाशांमध्ये एकच पळापळ सुरू झाली.
डब्यात आग लागली आहे या भीतीने अनेक प्रवाशांनी तातडीने धावत्या आणि थांबलेल्या रेल्वेतून खाली उड्या मारल्या. रेल्वेतून उतरलेले हे प्रवासी सुरक्षित जागेचा शोध घेत असतानाच शेजारच्या समांतर रेल्वे रुळावर गेले. दुर्दैवाने, त्याच वेळी विरुद्ध दिशेने गाडी क्रमांक २०४२४ फिरोजपूर-सीवनी पातालकोट एक्सप्रेस प्रचंड वेगाने येत होती. रुळावर प्रवासी असल्याचे लक्षात येईपर्यंत पातालकोट एक्सप्रेसची धडक बसली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, रेल्वे सुरक्षा बल (RPF), आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सराय छोला पोलीस ठाण्याचे प्रभारी के. के. सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून तीन महिला आणि एका लहान मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने बचावकार्य पूर्ण केले असून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. अपघाताचे मूळ कारण ठरलेली ती आग लागल्याची अफवा नेमकी कोणी आणि का पसरवली, तसेच चेन ओढण्यामागचे कारण काय होते, याचा सखोल तपास रेल्वे आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे. एका चुकीच्या माहितीमुळे चार निष्पाप जीव गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.




