नाशिक | Nashik
नाशिकच्या औद्योगिक,कृषी आणि निर्यात क्षमतेला चालना देणारा मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क (MMLP) प्रकल्प अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे ८५० कोटी खर्चाच्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष कामकाज कधी सुरू होणार असा सवाल आज (दि.१६) रोजी संसदेत खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी उपस्थित करत लोकसभेत केंद्र सरकारला जाब विचारला. तर खासदार वाजे यांनी वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडे उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नाशिकमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क प्रस्तावित असल्याची कबुली दिली. मात्र, हा प्रकल्प अद्याप मंजूर झालेला नाही, आणि मंजुरीनंतर पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले.
नाशिक हा केवळ महाराष्ट्रातील (Maharashtra) एक जिल्हा नाही, तर देशाच्या लॉजिस्टिक्स आणि व्यापार साखळीतील एक नैसर्गिक केंद्र आहे. देशभरातून जेएनपीटीकडे जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य रेल्वे मार्ग नाशिकच्या परिसरातून जातात. त्यातच आगामी वाढवन डीपसी पोर्ट अवघ्या १६० किमी अंतरावर असल्याने नाशिकचे धोरणात्मक महत्त्व भविष्यात अनेक पटींनी वाढणार आहे. हा प्रकल्प केवळ उत्तर महाराष्ट्राच्या विकासापुरता मर्यादित नसून, तो देशाच्या पुरवठा साखळीला बळ देणारा निर्यात वाढवणारा आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला गती देणारा ठरू शकतो, असे मत
खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले.
नाशिक हा द्राक्ष, कांदा, भाजीपाला, अॅग्री-प्रोसेसिंग आणि निर्यात उद्योगांचा केंद्रबिंदू आहे. मात्र वाढते वाहतूक खर्च, कोल्ड-चेन सुविधांचा अभाव आणि पोस्ट-हार्वेस्ट नुकसान याचा थेट फटका शेतकरी, उद्योजक आणि युवकांना बसत आहे. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क तातडीने उभारणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच, नाशिकचा एमएमएलपी हा चेन्नई, बंगळुरू, नागपूर आणि इंदूरप्रमाणेच एकाच वेळी मंजूर होऊन कार्यान्वित व्हावा, अशी मागणी खासदार वाजे यांनी संसदेत (Parliament) केली.




