शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राज्यातील शिवसेनेचे अनेक आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तंबूत गेले आहेत. त्या पाठोपाठ आता काही खासदारही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याची भाषा बोलू लागले आहेत. याचसंदर्भात शिर्डीत पत्रकारांनी खासदार सदाशिव लोखंडे यांना छेडले असता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या (सोमवार)चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आपण आतापर्यंत काँगेस आणि राष्ट्रवादीशी लढलो आहोत, त्यामुळे भाजपाशी युती करावी अशी मागणी खासदारांची होती. आपण शिर्डी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपाच्या मदतीने निवडून आल्याचे सांगितले.
सदाशिव लोखंडे हे कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून तीन वेळा भाजपचे आमदार राहिले आहेत. तरूणपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चेंबूर शाखेत सक्रिय होते. भाजपचे नेते दिवंगत प्रमोद महाजन यांचे ते समर्थक होते. कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील आरक्षण निघाल्यावर तेथून मात्र त्यांनी निवडणूक लढविली नाही.
2014मध्ये लोकसभा निवडणूक सुरू असताना मतदानाच्या 15 दिवस आधी शिर्डी मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार काँग्रेसमध्ये गेल्याने शिवसेनेला उमेदवारच उरला नव्हता. शिर्डी मतदार संघात अनुसूचीत जातीचे आरक्षण आहे. त्यामुळे भाजपने त्यांचे माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून दिली. त्यामुळे 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे हे शिवसेनेच्या तिकीटावर खासदार झाले.