नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला. एकामागोमाग एक आकडेवारी सादर करत त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आम्ही सविस्तर अभ्यास केलाय, तिथे हेराफेरी झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. निवडणूक आयोग सरकारची गुलामी करतेय. आम्ही वारंवार राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आमचे डोकं फोडले. ३९ लाख मतदार कुठून आले आणि कुठे जाणार, आता हे ३९ लाख मतदार बिहारला जाणार. नावे तीच राहणार, आधार कार्ड तीच राहणार, फक्त ते मतदार फिरत राहणार. काही दिल्लीत आले, काही बिहारला जातील. महाराष्ट्र पॅटर्न दिल्ली, बिहार मग उत्तर प्रदेशातही राबवणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
पुढे राऊत असे ही म्हणाले की, हा एक नवा पॅटर्न भाजप वापरते. या नव्या पॅटर्नचा वापर करून भाजप निवडणूक लढवते आणि जिंकते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उपस्थित केलेल प्रश्न देशासाठी महत्त्वाचे आहेत”. “देशातील लोकशाही, लोकसभा, विधानसभा, राज्यसभा हे सगळे जर जिवंत ठेवायचे असेल तर, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर दिले पाहिजेत. माझे निवडणूक आयोगाला आवाहन आहे, तुम्ही या प्रश्नांची उत्तर द्यावीत. या सरकारनी तुमच्यावर टाकलेला पडदा काढा आणि या प्रश्नांची उत्तर द्या”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
राहुल गांधी काय म्हणाले?
महाराष्ट्रात विधानसभेत २०१९ आणि लोकसभा २०२४ मध्ये ३२ लाख मतदार मतदार वाढले झाले. म्हणजे पाच वर्षात ३४ लाख मतदार वाढले. मग पाच वर्षाच्या तुलनेत पाच महिन्यात एवढे मतदार कसे वाढले. हे लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी विचारला. या निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार वाढले. महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार कसे वाढले. महाराष्ट्राची लोकसंख्या ९ कोटी ५४ लाख. मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे वाढले, निवडणुकीपूर्वी एवढे मतदार कसे आले? पाच महिन्यात सात लाखापेक्षा अधिक मतदार आले. विधानसभेत ३९ लाख नवीन मतदार आले कसे? असा सवाल उपस्थित करत हेराफेरी झाल्याचा आरोप राहुल गांधीनी केला.
“महाराष्ट्रात विरोधी पक्षांना जितक्या मतदारांनी मतदान केले त्यांची संख्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान अजिबात कमी झालेली नाही. काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात १.३६ लाख मते मिळाली. विधानसभेत आम्हाला तिथेच १.३४ लाख मते मिळाली. यात फारसा फरक पडलेला नाही. पण या काळात या मतदारसंघात ३५ हजार नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे भाजपाला लोकसभेत १.९ लाख मते मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मते मिळाली. यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले. हे फक्त एका मतदारसंघातले नाहीये. हे अनेक मतदारसंघांमध्ये दिसतेय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मतदारसंघांमध्ये हे दिसून आले आहे”, असा दावा राहुल गांधींनी केला आहे. महाराष्ट्रात आमची मते कमी झालेली नाहीयेत, भाजपाची वाढली आहेत.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी एससीपी नेत्या खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या,, “…आम्हाला मतपत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्यायच्या आहेत जिथे आमचे उमेदवार जिंकले आहेत. ११ जागा अशा आहेत जिथे पक्षाच्या चिन्हांमधील गोंधळामुळे आम्ही निवडणुका गमावल्या. सत्तेत असलेल्या पक्षानेही हे मान्य केले आहे. आम्ही ‘तुतारी’ चिन्ह बदलण्यासाठी अनेक विनंत्या केल्या. परंतु निवडणुक आयोगाकडून विनंती मान्य करण्यात आली नाही… आम्ही फक्त निवडणूक आयोगाला निष्पक्ष राहण्याची मागणी करतो…”
सुप्रिया सुळेंनी राहुल गांधी, संजय राऊतांसमोर पत्रकार परिषदेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नावही घेतले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. राज ठाकरे पण म्हणाले की, मनसेचा एक उमेदवार आहे, त्याला स्वत:चे देखील मत मिळालेले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. याबाबतचा सर्व डेटा तुमच्यासमोर आहे, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत दिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा