ओझे | वार्ताहर | Oze
महायुतीने (Mahayuti) विविध योजनांची घोषणा करत सत्ता मिळवली. मात्र, आता या योजनांचे पैसे (Money) द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत, विकासकामांना निधी नाही. त्यामुळे राज्य शासनाची आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच आरोग्य केंद्राच्या इमारतीचे पशुवैद्यकीय दवाखाना बहुद्देशीय इमारत सांस्कृतिक भवन भव्य प्रवेशद्वार या विकासकामांचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे व अन्न व औषधं प्रशासन विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.
पुढे बोलताना सुळे यांनी खेडगाव (Khedgaon) येथे होत असलेल्या विकासाबाबत गौरोदगार काढत आदर्शवत काम असल्याची शाबासकी दिली. यावेळी त्यांनी राज्य शासनाचे कारभारावर चौफेर टीका केली. तर यावेळी बोलताना अन्न व औषधं प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी खेडगाव येथील सरपंच दत्तात्रय पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा असल्याने खेडगाव येथे विविध विकासकामे होत असून आपल्या खेडगावसह मतदारसंघाच्या विकासासाठी कटींबद्ध असल्याचे सांगितले. आजपर्यंत खेडगाव व परिसराच्या विकास करण्यासाठी भरीव असा निधी दिला आहे. भविष्यात ही टप्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात थोडे गंमतीदार किस्से सांगून रंगत आणली. तसेच खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagare) यांनी आपण खासदार सुळे यांचे नेतृत्वात संसदेत सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.
दरम्यान, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक सरपंच दत्तात्रेय पाटील यांनी करत विकासकामांचा आढावा घेत विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तर सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक व योगिता पवार यांनी केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा) जयंत दिंडे, चिंतामण गावित, गोकुळ पिंगळे कादवाचे व्हा. चेअरमन शिवाजी बसते, संचालक सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, बाळासाहेब जाधव, मार्केट कमिटी अध्यक्ष प्रशांत कड, वसंत कावळे, रावसाहेब संधान यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य महिलांची उपस्थिती प्रार्थनीय होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व कार्यकर्ते, ग्रामविकास अधिकारी थोरात भाऊसाहेब, ढोकरे भाऊसाहेब राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी मेहनत घेतली.
झिरवाळ तुम्ही आमच्यासाठी पक्ष पलीकडे
झिरवाळ तुम्हाला आम्ही पक्षाचे मानत नाही. तुमची आमची बांधिलकी वेगळी आहे. मी काय सरकारबद्दल बोलतेय तुम्ही जास्त मनावर घेऊ नका, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
संसार चालायला दोन्ही बाजूने प्रयत्न व्हायला हवे
जुळवून घ्या या मुद्द्याला हात घालताना ही बाब दोन्ही बाजूने व्हायला हवी. कुणी तरी सकाळी वेगळी दुपारी वेगळी तर रात्री वेगळीच भूमिका घेणार असेल तर कसे होणार जवळीक एकत्र संसार कसा होणार, असा सवाल करत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे चर्चेवर सुळे यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला.
भुजबळांचे कौतुक, कोकाटे यांच्यावर हल्लाबोल
सुळे यांनी भुजबळ यांनीही जिल्ह्याचे नेतृव चांगले केल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता नोटीस मुद्द्यावरून हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की, “तुमच्या विचाराच्या कुणीतरी तुम्ही पत्ते खेळतानाचे व्हिडीओ काढून अब्रू काढली अन तुम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करण्याऐवजी रोहित पवारला काय नोटीस देता? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला.
लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार
सुळे यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत निवडणूक तोंडावर कसेही पैसे उधळले. पुरुषांनीही लाभ घेतला आता २५ लाख लाभार्थी कमी झाले म्हणजे या योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चुकीच्या नियोजनाने हे राज्य आर्थिक अडचणीत येत दिवाळखोरीत गेले आहे असेही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री भेट देत नाही म्हणून अमित शहा यांना भेटतो
..
राज्यातील जनतेच्या विविध प्रश्नावर मुख्यमंत्री यांच्याकडे पाच ते सहा वेळा वेळ मागितली मात्र ते वेळ देत नाही. जनतेला संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन ते पाळत नाही. शेवटी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटून शेतकऱ्यांचे जिल्हा सहकारी बँकेचे प्रश्न मांडले, असेही सुळे यांनी सांगितले.




