मुंबई । Mumbai
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अखेर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 28 सप्टेंबर 2025 रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 पुढे ढकलण्यात आली असून आता ही परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. गाव-तालुक्यांचा संपर्क तुटल्याने परीक्षार्थींना केंद्रांवर पोहोचणे अशक्य होण्याची भीती होती. तसेच हवामान विभागाने आगामी काही दिवसांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने आयोगाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला.
या पार्श्वभूमीवर उमेदवारांपैकी कोणीही परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने एमपीएससीला परीक्षा पुढे ढकलण्याची औपचारिक विनंती केली होती. शासनाचे पत्र दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी आयोगाकडे पाठवण्यात आले. त्यानंतर आयोगाने तातडीने बैठक घेऊन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 28 सप्टेंबर रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांमधील 524 उपकेंद्रांवर होणार होती. मात्र पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक उमेदवार अडचणीत येऊ शकले असते. त्यामुळे आयोगाने परीक्षेची नवी तारीख 9 नोव्हेंबर 2025 जाहीर केली आहे. 9 नोव्हेंबरला आधीपासून नियोजित असलेली महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या बदलामुळे पुढे ढकलावी लागणार आहे. या परीक्षेची सुधारित तारीख शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे लवकरच जाहीर केली जाणार आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूरस्थिती आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांचा विचार करून एमपीएससीला अधिकृत पत्र पाठवले होते. फडणवीस म्हणाले, “राज्यातील अनेक भागात झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने आयोगाकडे मागणी केली होती. परीक्षार्थींच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.”
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षांकडून देखील हीच मागणी करण्यात आली होती. परीक्षार्थींच्या सुरक्षेला प्राधान्य देत आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे.




