मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील परीक्षांची एसआयटी नेमून चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. याशिवाय परीक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील अशा परीक्षांची फेरतपासणी केली जाईल. तोपर्यंत उमेदवारांच्या मुलाखती थांबवण्यात येईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटणे, प्रश्नपत्रिका फोडण्यात आयोगाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग आणि एमपीएससीचा कारभार याविरोधात पुणे, नागपूर येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. विद्यार्थ्यांचा आक्रोश लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. एमपीएससीच्या गट ब २०२५ पूर्व आणि मुख्य तसेच गट क २०२५ पूर्व आणि मुख्य या परीक्षांची चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीचा सखोल तपास सुरू असून सरकारला प्रणाली सुधारण्यात रस आहे, लपवण्यात नाही. हा तपास अजून संपलेला नसून तो शेवटच्या टप्प्यापर्यंत नेण्यात येईल. पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी आयोगाचे अवर सचिव अभिजित लेंडवे, सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाशे, गोपाळ मराठे यांना अटक केली आहे. या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील परीक्षांची चौकशी करण्यात येईल. एमपीएससीचे अध्यक्ष, सचिव यांच्याविरोधात कोणताही पुरावा दिला, तर त्याची स्वतंत्र चौकशी करायला सरकार तयार आहे. पेपर फुटीत जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. कुणालाही वाचवण्याचा प्रश्नच येत नाही, अशी ग्वाही फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिली.
पुढील स्पर्धा परीक्षा पारदर्शीपणे व्हाव्यात म्हणून लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने भरती प्रक्रिया होत असल्याने संपूर्ण यंत्रणा सज्जतेनंतरच परीक्षा घेण्यात येतील. स्पर्धा परीक्षांच्या सर्वंकष सुधारणांसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत नवीन समिती नेमण्यात आली आहे. ही समिती राज्यभर जाणार असून विद्यार्थ्यांनी समितीसमोर आपले प्रश्न, तक्रारी मांडून खुलेपणाने चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना केले.




