Friday, November 22, 2024
Homeनगरसौंदाळा येथे महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण

सौंदाळा येथे महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील सौंदाळा वीज उपकेंद्राजवळ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी काम करत असताना शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीत म्हटले की, सोमवार 21 ऑक्टोबर रोजी दुपारी पाऊस झाल्याने, सौंदाळा येथून दहिगावकडे जाणार्‍या वीज वाहिनीत बिघाड होऊन 26 गावांचा वीजपुरवठा बंद झाला होता. बुधवार 23 ऑक्टोबर रोजी पहाटे सौंदाळा येथील सबस्टेशनजवळ बिघाड झाला असल्याचे महावितरण अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लक्षात आले.

- Advertisement -

रात्री उशिरा अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयंत पाटील, कनिष्ठ अभियंता विकास दिवेकर हे सौंदाळा येथे आले. महावितरणचे कर्मचारी अशोक मुरदारे, अशोक गुंजाळ, सचिन फुलारी, मनोज गिरमे हे वीज केंद्रापासून तिसर्‍या पोलवर बॅटरीच्या प्रकाशात वीज वाहिनी दुरूस्तीचे काम करत होते. दरम्यान सचिन फुलारी यांनी विकास दिवेकर यांना फोन करून सांगितले की, ज्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. तिथे गोवर्धन आरगडे, शरद आरगडे, भारत आरगडे हे आले आहेत. काम करू नकाच शिवाय पोलवरून खाली उतरायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ करत असल्याची माहिती मिळताच संजय पाटील, विकास दिवेकर, शेवगावचे उपकार्यकारी अभियंता मनोज पुरोहित तिथे गेले. त्याठिकाणी आरोपीच्या हातात काठी, गज होते.

शरद आरगडे म्हणाला की, तुमचे पोलवर काम करत असलेले दोन कर्मचारी यांना खाली उतरून देणार नाही. तुम्ही येथे काम करायचे नाही. संजय पाटील यांनी त्यांना मी, महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे. वीज पडल्याने दोन दिवसांपासून 26 गावांचा वीजपुरवठा बंद आहे. तुम्ही आम्हाला आमचे कामकाज करू द्या. सरकारी कामात अडथळा करू नका असे समजावून सांगितले. या गोष्टीचा राग आल्याने शरद आरगडे याने त्यांच्या तोंडात मारली व हातातील लोखंडी गज जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारत असताना ते बाजूला झाले.

त्यामुळे गज डाव्या कानावर लागून दुखापत झाली. गोवर्धन आरगडे व भरत आरगडे यांनी लाकडी काठीने पाठीवर व डावे हातावर मारून दुखापत केली. तेव्हा महावितरणचे कर्मचार्‍यांनी मारहाण करत असलेल्या तिन्ही आरगडे यांच्या तावडीतून पाटील यांना सोडविले. तुला आम्हाला जिवे मारायचे होते. परत महावितरणचे कर्मचारी येथे कामकाज करण्यासाठी आले तर सोडणार नाही, अशी धमकी देऊन तेथून निघून गेले. यावेळी संजय पाटील यांनी कुकाणा पोलीस चौकी येथे सरकारी कामात अडथळा व मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. यावेळी नेवासा येथील कार्यकारी अभियंता राहुल बडवे, सहायक अभियंता वैभव कानडे, रोहित तायडे, संजय थोरात उपस्थित होत.

या घटनेतील आरगडे बंधूंवर कारवाई न झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करतील, असा इशारा अभियंता संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीरज गायकवाड यांनी दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या