मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून घोषणा आणि योजनांची बरसात केली जात आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णयांचा सपाटा लावला जात आहे. मुंबईतील टोल नाक्यावरील हलक्या वाहनांचा टोल रद्द करण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला आहे. त्यानंतर आता दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे.
दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून दरवर्षी १० टक्के हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान तब्बल एका महिन्यासाठी ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांना दिलासा देत एसटी महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक जण आपल्या गावी, पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी जात असतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन मंडळाला आहे. उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते, त्या प्रमाणे या वर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. पण, आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
एसटीने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत जमा होणारी अतिरिक्त रक्कम यंदा जमा होणार नाही. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी हा मार्ग स्वीकारला होता. परंतु आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही.
दरम्यान, दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवासी एसटीला प्राधान्य देत असतात. १० टक्के हंगामी भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, यंदा एसटीच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा