Friday, April 25, 2025
Homeनगरनिकष पात्र महिलांची माहिती संकलन सुरू

निकष पात्र महिलांची माहिती संकलन सुरू

बहिण माझी लाडकी || प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने केलेल्या घोषित केलेल्या लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असणार्‍या, निकर्षात बसणार्‍या महिला आणि मुलींची माहिती घेण्याच्या सुचना महिला बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्यानूसार शनिवारपासून जिल्हाभर या योजनेसाठी पात्र असणार्‍यांची माहिती अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांनी संकलीत करणे सुरु केले असून सोमवारपर्यंत या योजनेसाठी जिल्ह्यातून पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानूसार पात्र महिलांना महिन्यांला दीड हजार रुपये मिळणार असून यासंदर्भायील शासन निर्णयही जारी झाला आहे. दरम्यान, शनिवारी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी या योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील अधिकार्‍यांची दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेवून या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र व गरजू महिला भगिनींना देण्यात यावा.

- Advertisement -

एकही पात्र महिला भगिनी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा अग्रेसर राहील यादृष्टीने योजना अतिशय शिस्तबद्धपणे व काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण कराळे हे प्रत्यक्ष तर सर्व गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, परियोजना अधिकारी, महानगरपालिका अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 1 जुलैपासून योजना राबविण्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार असलेल्या व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा अधिक नाही अश्या महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांची ही अतिशय महत्वाकांक्षी योजना असून या योजनेला गती देत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.नगर जिल्हा विस्ताराने व लोकसंख्येने अधिक मोठा असल्याने जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागातील गरजू व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेणे आवश्यक असून या कामी अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिका, मुख्यसेविका, वॉर्ड अधिकारी यांचा सहभाग महत्वाचा ठरणार असल्याने यादृष्टीने यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, या योजनेसाठी पात्र असणार्‍या महिलांसाठी काही निकष देण्यात आलेले असून त्यानूसार लोकसंख्याच्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातून किती महिला योजनेसाठी पात्र ठरणार आहेत, याची माहिती संकलित करण्यात आहे. येत्या दोन दिवसात प्राथमिक आकडेवारी जमा होणार असल्याचे महिला बालकल्याण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

योजना मिशन मोडवर राबवा- येरेकर

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील एकल महिलांबरोबरच प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळेल यासाठी ‘माझी लाडकी बहिण’ योजना जिल्ह्यात मिशन मोडवर राबविण्यात यावी. अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांनी महिलांना एकत्रित करून योजनेचे महत्व समजून सांगत समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. योजना राबविण्यासाठी अतिशय कालबद्ध कार्यक्रम शासनाकडून देण्यात आला. योजनेच्या लाभासाठी 1 जुलैपासून अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार असून 15 जुलै ही अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख असणार आहे. 16 जुलै रोजी तात्पुरती यादी प्रकाशन होणार असून 16 ते 20 जुलै या कालावधीत तात्पुरत्या यादीवरील तक्रारी व हरकती प्राप्त करण्यात येणार आहेत. 21 ते 30 जुलै दरम्यान तक्रारी, हरकतीचे निराकरण करून 1 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. 10 ऑगस्ट लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई-केवायसी तर 14 ऑगस्ट लाभार्थी निधी हस्तांतरण त्यानंतर प्रत्येक महिन्यांच्या 15 तारखेपर्यंत निधी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. ही योजना गतीने राबवून गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...