Friday, November 15, 2024
Homeनगरमाझी लाडकी बहिण योजनेत मुख्यमंत्रीच ‘हद्दपार’!

माझी लाडकी बहिण योजनेत मुख्यमंत्रीच ‘हद्दपार’!

राष्ट्रवादीच्या नगरच्या कार्यक्रमात पोस्टर, बॅनरसह माहिती पत्रकात केवळ ‘दादां’ची छबी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरमध्ये सोमवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महिला संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार यांनी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या विविध योजनांची जंत्रीच वाचून दाखवली. या सर्व योजना राज्यातील कष्टकरी महिला, शेतकरी, यासह उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी त्यांनी मंजूर केल्याचे ठणकावून सांगितले. तसेच या योजना पुढे सुरू ठेवायाच्या असतील तर महायुतीलाच निवडून द्या ,असे आवाहन केले. दरम्यान, या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या व्यासपीठासह नगर शहरात विविध भागात लावलेले पोस्टर, बॅनर आणि कार्यक्रमस्थळी वाटण्यात आलेल्या माहिती पत्रकावरून मात्र, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून मुख्यमंत्री यांना हद्दपार केल्याचे दिसून आले.

- Advertisement -

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरून चांगलाच श्रेयवाद रंगण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझी लाडकी बहिण योजना ही त्यांची महत्वाकांक्षी योजना असल्याचा दावा करत असतांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या नाव आणि फोटोसकट गायब केले आहे. नगरमधील कार्यक्रमात याची प्रचिती आली. लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीत येणार्‍या अडचणी समजून घेण्यासाठी सोमवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर केवळ एकच खुर्ची ठेवण्यात आली होती. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह आ. संग्राम जगताप, माजी आ. अरूण जगताप, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, बाळासाहेब नहाटा हे देखील व्यासपिठाखाली मेळाव्यासाठी ठेवण्यात आलेल्या खुर्च्यावर बसलेले होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यातील कष्टकारी महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना राबवण्यात येत असल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांनी दहावेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. मात्र, तरी देखील राज्यातील सामान्य महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या नसल्याने त्यांना महिन्याला दीड हजार रुपये देऊन आर्थिक सक्षम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 45 हजार कोटींची तरतूद केली असल्याचे स्पष्ट केले. यासाठी संबंधित महिलांचे बँकेत खाते उघडून त्यांच्या खात्यावर थेट मंत्रालयातून पैसे टाकत पारदर्शक योजना राबवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तरी विरोधक या योजनेवर चुनावी जुमला म्हणून टीका करत असल्याचे पवार यांनी सुनावले. यासह मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांचे शंभर टक्के शुल्क सरकार भरणार आहे. यासाठी 8 लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍या कुटुंबांना मदत होणार आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना ई-पिंक रिक्षा देण्यात येणार आहे. वर्षाला तीन मोफत गॅस टाक्या देण्यात येणार असून यात महिलांच्या नावे कनेक्शन असणार्‍यांच्या खात्यात थेट अनुदानाची रक्कम टाकण्यात येणार आहे.

यासह शेतकर्‍यांची वीज बिल माफी, त्यांना सौर वीज, शेतकर्‍यांच्या दुधाला जादाचे 5 रुपयांचे अनुदान, महिला बचत गटांना वाढीव खेळते भांडवल, तरूणांना मोफत प्रशिक्षण आणि महिन्याला दहा हजारांचे मानधन यासह अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या योजनांची जंत्रीच पवार यांनी वाचून दाखवली. यावेळी महिलांसोबत अजित पवार हे संवाद साधणार होते मात्र केवळ एकच प्रश्न विचारून झाल्यावर नगरच्या महिला भगिनींचे फार प्रश्न नाहीत, असे म्हणत संवाद कार्यक्रम आटोपता घेतला. यावेळी अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी नगरकरांची एकच तोबा गर्दी उडाली होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला पवार यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यानंतर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

नगर शहरासाठी 300 ई- पिंक रिक्षा
राज्यातील 17 शहरांत ई-पिंक रिक्षा देण्यात येणार आहेत. यात नगर शहराचा समावेश असून याठिकाणी 300 शिक्षा देण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थी महिलेला 35 हजार रूपये भरल्यानंतर सरकार 70 हजारांचे अनुदान देणार असून उर्वरित रक्कम बँकेकडून कर्जस्वरूपात घ्यावी लागणार आहे. त्यानंतर दररोज 200 रूपये प्रमाणे महिलांना 6 ते साडे सहा हजार रूपये भरत काही वर्षात कर्ज संपल्यावर संबंधित रिक्षा ही महिलांची स्व: मालकीची होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

टायमिंग चुकल्याची कबुली
माझी लाडकी बहिण योजनेत एकदा अर्जात चुक झालेली असल्यास झालेली चूक सुधारण्यास सरकारच्यावतीने संधी देण्यात येणार असून पालकमंत्री, आमदार, तालुका आणि ग्राम पातळीवर असणार्‍या समित्यांना दाखल महिलांच्या अर्जाची पडताळणी करता येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. सोमवारपासून हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आज पहिलाच दिवस असल्याने सकाळपासून टायमिंग चुकला आहे. पारनेरनंतर नगर शहर, त्यानंतर श्रीगोंदा आणि शेवटी कर्जत याठिकाणी महिला संवाद मेळावा होणार आहे. सायंकाळी सहानंतर महिलांना मेळाव्यासाठी थांबणे शक्य नाही आणि थांबणे देखील चुकीचे आहे. पहिलाच दिवस असल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाचा टायमिंग चुकल्याची कबुली उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या