Friday, September 13, 2024
Homeनगरमुळा, प्रवरा गोदावरी दुथडी; 80000 क्युसेकने पाणी जायकवाडीकडे

मुळा, प्रवरा गोदावरी दुथडी; 80000 क्युसेकने पाणी जायकवाडीकडे

गोदावरी 52308 क्युसेक || प्रवरा 13051 क्युसेक || मुळा 15000 क्युसेक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

आषाढ सरींच्या तांडवानंतर आता भंडारदरा, मुळा, दारणा आणि गंगापूर धरणांच्या पाणलोटात श्रावणसरींचे तांडव सुरू असल्याने या सर्व धरणांमधून नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे. परिणामी नाशिक-नगर जिल्हयातून मुळा, प्रवरा आणि गोदावरी नदीद्वारे सुमारे 80000 क्युसेकने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे. या आवकेमुळे ‘समन्यायीं’चा तिढा सुटण्याची शक्यता आहे. ‘समन्यायी’ची टांगती तलवार कधी दूर होते. याकडे नगर-नाशिक जिल्हयाचे लागले आहे.

- Advertisement -

जायकवाडी जलाशयात सायंकाळी 6 वाजता उपयुक्तसाठा 41.29 टक्के इतका झाला होता. जलाशयात 44099 क्युसेक ने विसर्ग दाखल होत हाता. उपयुक्तसाठा 31.66 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 57.73 टीएमसी इतका झाला होता. गोदावरीचा जास्तीचा विसर्ग रात्री 10 नंतर जायकवाडी जलाशयात सामावेल. नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ गोदावरीत 35600 क्युसेक विसर्ग मोजला गेला. तर प्रवरा, मुळातील नेवासे तालुक्यातील मधमेश्वर जवळ 39510 क्युसेकने पाण्याची आवक होत होती. रात्र दहा नंतर 80 हजाराच्या आसपास विसर्ग जायकवाडी जलाशयात सामावू शकेल. त्यामुळे जायकवाडीत उपयुक्तसाठा वाढणार आहे.

दरम्यान, शनिवारच्या मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काल रविवारीही पावसात जोर होता. काल नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून 52308 क्युसेक ने विसर्ग गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात येत होता. नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने काल सकाळी 8 वाजता या धरणातून 39002 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग 9 वाजता वाढवून तो 52308 क्युसेक इतका करण्यात आला. जायकवाडी च्या दिशेने हे पाणी वेगाने वाहत आहे. हा विसर्ग काल दिवसभर टिकून होता. त्यामुळे गोदावरी नदीला पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. दुथडीभरुन ही नदी वाहत असून गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक शहरासह इगतपूरी, त्र्यंबकेश्वर भागात पावसात जोर होता. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत दारणाच्या पाणलोटातील इगतपुरीला 136 मिमी पावसाची नोंद झाली. घोटीला 96 मिमी, दारणाच्या भिंतीजवळ 70 मिमी, भावलीला 136 मिमी, भाम 126 मिमी असा पाऊस नोंदला गेला. दारणात 24 तासात पाऊण टीएमसी पाण्याची आवक झाली. दारणातून 14416 क्युसेकने विसर्ग सुरु होता. धरणाच्या सहाही वक्राकार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दारणाचा साठा 96.68 टक्के पाणी साठा ठेवून उर्वरित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल पर्यंत दारणातून या हंगामात 10.5 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मुकणे धरण 70.09 टक्क्यांवर पोहचले आहे. वाकी मध्ये 89.93 टक्के पाणीसाठा झाला आहे. भाम, भावली, वालदेवी हे 100 टक्के भरले आहेत. कडवा धरणातुन 5626 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातील अंबोलीला 133 मिमी, त्र्यंबकेश्वर ला 67 मिमी, गंगापूरला 123 मिमी, कश्यपीला 137 मिमी, गौतमी गोदावरीला 75 मिमी, नाशिकला 41 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरण 91.58 टक्के भरलेले आहे. 24 तासांत या धरणात 252 दलघफू नविन पाणी दाखल झाले. गंगापूर मधुन 8428 क्युसेक ने विसर्ग करण्यात येत आहे.
नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने काल सकाळी 8 वाजता या धरणातून 39002 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग 9 वाजता वाढवून तो 52308 क्युसेक इतका करण्यात आला. जायकवाडी च्या दिशेने हे पाणी वेगाने वाहत आहे. हा विसर्ग काल दिवसभर टिकून होता. त्यामुळे गोदावरी नदीला पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. दुथडीभरुन ही नदी वाहत असुन गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या