सोनई |प्रतिनिधी| Sonai
मुळा धरणातून आवर्तन सोडावे व आवर्तन काळात रोहित्र बंद करू नये, कांदा निर्यात बंदी उठवावी, 85 कोटीच्या रस्त्यांच्या कामांची स्थगिती उठवावी, घोडेगावसह तालुक्यातील पाणी योजना बंद करू नये यासह शेतकर्यांच्या विविध प्रश्नावर आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सुमारे 5 हजार शेतकर्यांनी घोडेगाव येथे काल शनिवारी चार तास रस्ता रोको केला. घोडेगाव येथील व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबा दिला. एक-दोन दुकाने वगळता सर्व गाव बंद होते.
ट्रान्सफार्मर काही तास बंद करून काही तास चालू असा प्रस्ताव पाठविला जाईल तसेच तालुक्यातील कुठलीही पाणी योजना बंद केली जाणार नाही असे अधिकार्यांनी आश्वासन दिले. त्यामुळे हे आंदोलन थांबिण्यात आले. जर हे आश्वासन पाळले गेले नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा आमदार गडाख यांनी दिला.
नेवासा तालुक्यासाठी सुमारे 425 कोटीच्या पाणी योजना मंजूर केल्या आहे. परंतु या योजना बंद करण्याचे षडयंत्र माजी लोकप्रतिनिधींकडून चालू आहे. सुरुवातीला घोडेगाव पाणी योजना बंद करून तालुक्यातील उरलेल्या योजना बंद करण्याची कूटनीती चालू आहे त्यांचा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठी माझा प्रखरपणे विरोध चालू राहणार आहे असे आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले. पाणी योजना काम बंद पडावी यासाठी मुद्दाम त्रास दिला जातो पाणी टँकचे काम जलसंपदा विभागाने मोडकळीस आलेल्या इमारतीचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर न केल्यामुळे ठप्प आहे. अधिकारी सदर प्रस्ताव मंजूर करण्याऐवजी टोलवाटोलवी करण्यात धन्यता मानत आहेत.
जिल्ह्यातील, राज्यातील कोणत्याही पाणी योजनेला अवैध गौण खनिज वाहतूक केल्याचा दंड करण्यात आला नाही परंतु घोडेगावसाठी वेगळा नियम हा संशोधनाचा विषय आहे.
घोडेगाव पाणी योजनेच्या बाबतीत आडकाठी घालून तालुक्यातील इतरही योजना बंद पाडण्याचा डाव तालुक्यातील जनता यशस्वी होऊ देणार नाही असेही गडाख यांनी सांगितले.
अशोकराव गायकवाड, नामदेव महाराज कोरडे, सचिन चोरडिया, अशोक येळवंडे, बाळासाहेब सोनवणे, शरद रावसाहेब सोनवणे, सुरेश चौधरी, शरद नारायण सोनवणे, राम सोनवणे, डॉ. सुनील वैरागर, राजेंद्र पाटोळे, माजी सभापती कारभारी जावळे, चेअरमन नानासाहेब तुवर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून पाणी योजनेच्या प्रश्नाला व पाटपाण्यावर तालुक्याला होणार्या अन्यायाला वाचा फोडली. सुहास गोंटे यांनी सूत्रसंचालन केले. भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनास महिला भागीनीही मोठया संख्येने हंडे घेऊन उपस्थित होत्या.
याप्रसंगी माजीप्राचे कार्यकारी अभियंता श्याम वारे, उपअभियंता मृणाल धगधगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार संजय बिरादार, जलसंपदा कार्यकारी अधिकारी सायली कदम, उपविभागय पोलीस अधिकारी विजय पाटील, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, शनीशगिंणापूरचे पोलीस निरीक्षक राम कर्पे आदींसह घोडेगाव ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी आणि गडाख
आमदार शंकरराव गडाख यांची पाटपाणी प्रश्नावर आंदोलने राज्यात गाजली आहे तसेच तालुक्यातील पाण्यासाठी गडाख यांनी दोन रात्री तुरुंगात काढल्या आहेत. गडाख यांच्या आंदोलनावर विरोधक टीकाही करत असतात परंतू शेतकर्यांना पाण्यासाठी गडाख यांच्यावरच विश्वास असल्याची भावना तालुक्यातील जनतेत आहे.
पाटपाणी, महावितरण तसेच कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने शुल्क लावल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. घोडेगाव येथील रस्ता रोको मध्ये तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी स्वतःहून हजर होते तसेच घोडेगाव येथील पाण्याच्या प्रश्नांसाठी महिलाही भर उन्हात चार तास एका जागेवर बसून होत्या.