Sunday, May 19, 2024
Homeनगरकामचुकार कर्मचार्‍यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

कामचुकार कर्मचार्‍यांची आयुक्तांकडून कानउघाडणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपाची घरपट्टी, पाणीपट्टी व इतर मागील कराची थकबाकी सुमारे 188 कोटी रूपये असून त्यामध्ये 101 कोटींची शास्तीची थकबाकी आहे. यासाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 100 टक्के शास्ती माफीची घोषणा करून 31 ऑगस्टपर्यंत करदात्यांना दंडाची रक्कम माफ करून सवलत दिली आहे.

- Advertisement -

करदात्यांनी 31 ऑगस्टपर्यंत कर भरावा अन्यथा त्यानंतर जप्तीची कार्यवाही केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जाळवे यांनी दिला. त्यामुळे आता नागरिकांना शास्ती माफी किंवा जप्ती यापैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. दरम्यान, यावेळी आयुक्तांनी मनपा कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. नकारात्मक मानसिकता सोडा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असे थेट बजावले आहे.

मनपा प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त डॉ. जावळे यांनी विभागप्रमुख व वसुली क्लर्कची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, सहाय्यक आयुक्त सचिन राऊत आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, मनपा कर्मचार्‍यांनी मनपा ही माझी संस्था आहे हे समजून प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. मी आता कुठल्याही कर्मचार्‍यांची तक्रार ऐकून घेणार नाही. मला कुठलेही कारण सांगायचे नाही तर मला नगरकरांना तुमच्या माध्यमातून सेवा द्यायची आहे.

मनपा ही नगरकरांना सुविधा देण्यासाठी आहे. तुमच्या पगारासाठी नाही. नागरिकांचे खिशातून तुमचे पगार करतो. आर्थिक परिस्थितीमुळे मी खड्डे बुजवू शकत नाही. 20 वर्षांपासून रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियोजन करा. एक महिन्याचे वसुलीचे नियोजन करून नागरिकांमध्ये जा, शास्ती माफीची जनजागृती करा. आपला संपर्क थेट मालमत्ता धारकांशी आहे. पैसे भरण्यासाठी नागरिकांची वाट पाहू नका त्यांच्या घरी जाऊन शास्ती माफीची माहिती द्या.

समजावून सांगा 100 टक्के शास्ती माफी देऊनही नागरिकांनी जर कर भरला नाही, तर जप्ती करून लिलाव प्रक्रिया राबवणार, नागरिकांनी शास्ती माफीचा लाभ घ्या, नाहीतर मानहानी स्वीकारा, आपल्याला मनपाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवायचे आहे. दिवस रात्र काम करा हलगर्जीपणा करू नका.कर्मचार्‍यांची मानसिकता नकारात्मक आहे. ती बदलावी तुम्हाला आता अंतिम सूचना दिली आहे.

कठोर कारवाई

जिल्हा न्यायालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी लोक अदालत होत आहे. यामध्ये सुमारे 14 हजार थकबाकीची प्रकरणे ठेवायची आहेत. कर्मचार्‍यांनी नागरिकांना नोटिसा द्याव्या, संपर्क साधावा. कर दात्यांनी कर भरल्यानंतर मनपाचे अधिकारी कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार मानावेत. एक महिना कर्मचार्‍यांना कुठलीही सुट्टी दिली जाणार नाही. सुट्टीच्या दिवशीही कर भरण्यासाठी ऑफिस सुरू राहतील. कामचुकार कर्मचार्‍यांचे इन्क्रिमेंट व पेन्शनवर शेरा मारला जाईल. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपापले काम प्रामाणिकपणे करावे व मनपाच्या माध्यमातून नगरकरांना विकासाच्या सुविधा द्याव्यात, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या