अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी या शासकीय योजनेच्या खात्यातून महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी विजयकुमार रणदिवे यांच्या वैयक्तिक खात्यात 15 लाख रुपयांची रक्कम वर्ग करून ती प्रत्येकी 5 लाख रुपये याप्रमाणे पुन्हा योजनेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आक्षेप चौकशी समितीच्या अहवालात घेण्यात आला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये हा प्रकार घडला असून, समितीच्या अहवालात या आक्षेपांसह 11 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्यावर आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा मागवला आहे.
आयुक्त डांगे यांनी 16 जानेवारी रोजी आरोग्य विभागाच्या कामकाजाची चौकशी उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्या समितीमार्फत प्रस्तावित केली होती. 31 जानेवारी रोजी समितीने अहवाल सादर केला असून यानुसार आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात शासकीय निधीच्या खात्यातून 15 लाख रुपये रणदिवे यांच्या वैयक्तिक खात्यावर पाठविण्यात आले व परत खात्यामध्ये वर्ग केल्याने अपहाराची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, देयकातून शासकीय कपाती व इपीएफमधून कपात केलेल्या रकमा भरणा केलेल्या नाहीत, विविध योजनांचे लेखे व कॅशबुकमध्ये त्रुटी, पीसीपीएनडीटी/ बॉम्बे नर्सिंग अॅक्ट अंतर्गत परवाने देण्यामध्ये त्रुटी, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधीतून सक्षम प्राधिकार्याची मंजुरी न घेता देयके अदा करणे, सेवा हमी कायद्यानुसार देण्यात येणार्या सेवांमधील अनियमितता, कार्यालयीन कामकाजाचे नियोजन व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण नसणे, एनयुएचएम व विविध कार्यक्रमांतर्गत कंत्राटी स्वरूपाची रिक्त पदे भरतीमध्ये अनियमितता, वैद्यकिय आरोग्य अधिकारी रँकिंगमधील क्रमवारीत सातत्याने शेवटच्या स्थानाजवळ असणे, औषध खरेदी व औषध साठा नोंदवही तपासणी दरम्यान संबंधित कर्मचारी यांनी कोणताही चार्ज न देता विनामंजुरी दीर्घ रजेवर जाणे, जैवविविध कचरा प्रकल्पातून मिळणार्या रॉयल्टीमधील अनियमितता असे 11 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.
या अहवालाच्या आधारावर कार्यालयीन कामकाजावर आपले नियंत्रण दिसून येत नाही, तसेच आपल्या कामकाजामध्ये सुधारणा झाल्याचे दिसुन आलेले नाही, सदरचे वर्तन कार्यालयीन शिस्तीस सोडून अत्यंत गैर, बेजबाबदारपणाचे आणि कार्यालयीन कामकाजामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा करणारे व अत्यावश्यक सेवेमध्ये अडथळा निर्माण करणारे आहे, असा ठपका ठेवत आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आयुक्त डांगे यांनी बजावलेली नोटीस डॉ. अनिल बोरगे यांच्या अग्निशमन केंद्रशेजारी असलेल्या त्रिदल बिल्डिंगमधील घराच्या दरवाजावर चिटकवण्यात आली आहे. महापालिकेच्या रेकॉर्डला त्यांचा याच घराचा पत्ता असल्याने तेथेही नोटीस चिटकवण्यात आल्याचे मनपाकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्यांना ईमेलव्दारे व समक्षही नोटीस देण्यात आल्याचे समजते.
चौकशी समितीचा निर्णय मान्य नाही : डॉ. बोरगे
डॉ. बोरगे यांनी नोटीस बजावल्यानंतर चौकशी अहवालाची प्रत मागवली आहे. तसेच, मला त्रिसदस्यीय समितीसमोर बाजू मांडण्याची संधी दिलेली नाही, त्रिसदस्यीय समितीने मला आरोपांबाबत चौकशीकामी पत्र दिलेले नाही. तसेच काय आरोप आहेत व चौकशी नेमक्या कोणत्या आरोपाखाली आहे, यासंदर्भात सुध्दा कल्पना दिलेली नाही, मला उपस्थित राहणेबाबत संधी दिलेली नाही, चौकशी समितीने निःपक्षपणे चौकशी होण्यासाठी मला पुरावे सादर करण्याची संधी दिलेली नाही, चौकशीच्या नियमानुसार नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन झालेले नाही, असे म्हणत त्रिसदस्यीय समितीने दिलेला निर्णय हा एकतर्फी असून नैसर्गिक न्याय तत्वास धरून नसल्याने तो मला मान्य नाही, असेही बोरगे यांनी म्हटले आहे.