Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधान परिषद निवडणूक : नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीत नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी एकजुटीचा...

विधान परिषद निवडणूक : नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीत नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी एकजुटीचा निर्धार

मतदार नगरसेवक सहलीला जाणार

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने शुक्रवारी नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीच्या मुद्द्यावर निर्माण झालेल्या संभ्रमानंतर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कार्यकर्त्यांना एकसंघ राहण्याचे आवाहन केले.

महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या घडामोडींमुळे महायुतीसमोर अंतर्गत समन्वयाचे आव्हान निर्माण झाले होते.

हा तिढा सोडवण्यासाठी भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले. गुरुवारी गणेश गिते यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर गोकुळ गिते यांनी प्रचार थांबविणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्याबाबत स्पष्ट भूमिका समोर न आल्याने संभ्रम कायम होता.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयोजित बैठकीत कोणत्याही प्रकारची फूट पडू नये आणि सर्व मतदार व पदाधिकारी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जावेत, असा संदेश देण्यात आला. बैठकीत गेल्या काही दिवसांतील समज-गैरसमज बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, निवडणुकीपूर्वी मतदारांमध्ये एकजूट कायम राहावी यासाठी सर्व मतदारांना शनिवारी सहलीसाठी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच मतदान प्रक्रियेबाबतही मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह महायुतीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. गिरीश महाजन हे जळगाव विधान परिषद निवडणुकीतील घडामोडींमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे बैठकीत सहभागी होत मतदारांशी संवाद साधला.

ताज्या बातम्या

Crime News : इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज पाठवून विवाहितेला त्रास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका विवाहित महिलेला वारंवार अश्लील मेसेज पाठवत मानसिक छळ केल्याप्रकरणी संबंधित मोबाईलधारकाविरोधात अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा...