Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारे ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ येत्या पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना फडणवीस यांनी हे विधेयक राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रात लिंगसमतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला.

राज्यातील कृषी क्षेत्रात ८१ टक्क्यांहून अधिक महिलांचा सहभाग आहे. बहुतांश कृषी धोरणे आणि शासकीय योजना पुरुषकेंद्री आहेत. जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी कृषी योजनांपासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला तसेच मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यासारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.

सर्व सूचनांचा विचार करून विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करा. कृषी क्षेत्रातील महिलांना ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता देणे, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश असावा. पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, बागायती, फुलशेती, मशरूम उत्पादन, कृषी वनीकरण, वनउपज संकलन अशा विविध उपक्रम तसेच भूमिहीन शेतकरी, भाडेकरू शेतकरी, शेतमजूर, चराई व्यवसाय करणारे आणि स्थलांतरित कृषी कामगार यांचाही यामध्ये समावेश करावा. महिलांना राज्य सरकारच्या कर्ज योजना, कृषी अनुदाने, बियाणे, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकेल, अशी डिजिटल प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सर्व अभ्यास करावा, अशा सूचना फडणवीस यांनी यावेळी केल्या

स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जावा. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती असावी, जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण करेल, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी यावेळी महिला सक्षमीकरण विधेयकाचे सादरीकरण केले. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीत नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिक विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने शुक्रवारी नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन करत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त...