Friday, May 3, 2024
Homeनगरमहापालिका : ‘स्थायी’ च्या आठ सदस्य निवडीसाठी येत्या शुक्रवारी सभा

महापालिका : ‘स्थायी’ च्या आठ सदस्य निवडीसाठी येत्या शुक्रवारी सभा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी आठ सदस्य दोन वर्षाच्या कार्यकालानंतर एक फेब्रुवारीला निवृत्त झाले आहेत. या रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्य निवडीसाठी येत्या शुक्रवारी (17 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. राष्ट्रवादी दोन, शिवसेना तीन, भाजप दोन व बसपचा एक असे आठ नवीन सदस्य निवडले जाणार आहेत. दरम्यान सदस्य निवडीनंतर सभापती पदासाठी निवडणूक होणार असून मनपातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पद वाटपात यंदा स्थायी समिती सभापती शिवसेनेला व सभागृह नेता पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

स्थायी समितीमधील रिता भाकरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे (शिवसेना), मीना चव्हाण, समद खान (राष्ट्रवादी), वंदना ताठे, रवींद्र बारस्कर (भाजप), मुदस्सर शेख (बसप) हे सदस्य निवृत्त झाले आहेत. रिक्त झालेल्या या आठ जागांवर महासभेत नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणार्‍या सभेत संबंधित पक्षांच्या गटनेत्यांकडून रिक्त जागांवर नवीन सदस्यांच्या निवडीसाठी नावे दिली जाणार आहेत.

त्यामुळे स्थायी समिती सदस्यत्व मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सदस्य निवडीनंतर सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. मनपा प्रशासनाकडून निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून निवडणूक जाहीर होऊन त्याचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

मनपात सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे आहे. तसेच मागील दोन वर्षात स्थायी समिती सभापतीपद राष्ट्रवादीकडे राहिले आहे. अगोदर अविनाश घुले सभापती होते आणि आता कुमार वाकळे सभापती आहेत. नव्या सभापती निवडीत हे पद शिवसेनेला दिले जाणार, अशी चर्चा होती.

मात्र सभापती पद सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसला त्या बदल्यात सभागृह नेता पद देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागील सभापती निवडीवेळीच हा निर्णय झाला होता व आताही चर्चा होऊन हा निर्णय झाल्याचे काही नगरसेवकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत अधिकृतपणे स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या