अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील तीन नगरपरिषद व एक नगरपंचायत क्षेत्रांमध्ये शनिवारी (20 डिसेंबर) होणार्या मतदान व रविवारी (21 डिसेंबर) सर्व 12 पालिकांसाठी मतमोजणीची प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (ओ) व 36 अन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी 18 ते 22 डिसेंबर या कालावधीत विशेष आदेश जारी केले असून, संबंधित कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील देवळाली प्रवरा, पाथर्डी, कोपरगाव नगरपरिषद, नेवासा नगरपंचायत तसेच श्रीरामपूर नगरपरिषद प्रभाग क्र. 3 (अ), संगमनेर प्रभाग क्र. 1 (ब), 2 (ब), 15 (ब), राहुरी प्रभाग क्र. 2 (अ), श्रीगोंदा प्रभाग क्र. 7 (ब), जामखेड प्रभाग क्र. 2 (ब) व 4 (ब), शेवगाव प्रभाग क्र. 1 (ब), 5 (अ), 12 (अ) आणि शिर्डी नगरपरिषद प्रभाग क्र. 6 (अ) येथे येत्या शनिवारी मतदान होणार आहे, तर या चार पालिकांसह 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या आठ परिषदेची एकत्रित मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सार्वजनिक शांतता अबाधित राहावी आणि मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
रस्त्यावर किंवा रस्त्याने जाणार्या कोणत्याही मिरवणुकीत अथवा जमावात गैरशिस्त वर्तनास मनाई करण्यात आली आहे.ठरवून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त किंवा निश्चित वेळेच्या बाहेर मिरवणूक, रॅली किंवा सभा काढण्यास मनाई करण्यात आली आली. तसेच मिरवणूक, जमाव तसेच प्रार्थनास्थळांच्या परिसरात गर्दी करून अडथळा निर्माण करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक रस्ते, घाट, धक्के, स्नानघाट, देवालये, मशिदी, दर्गे तसेच लोकांच्या ये-जा असलेल्या ठिकाणी गोंधळ व बेशिस्त वर्तन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही सार्वजनिक किंवा रस्त्यालगतच्या ठिकाणी विनापरवाना वाद्ये, ढोल-ताशे, कर्कश संगीत वाजविण्यास किंवा गाणी म्हणण्यास, सार्वजनिक ठिकाणी किंवा उपहारगृहांच्या आसपास विनापरवाना ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलीस प्रशासनाने दिला आहे. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण व निष्पक्षपणे पार पडावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.




