राहाता |वार्ताहर| Rahata
नगर परिषदेच्या निवडणुकीत आपलाच विजय व्हावा म्हणून देवाला साकडे घालण्यासाठी अनेक भावी नगरसेवक विविध ठिकाणी धार्मिकस्थळी देवदर्शनासाठी गेल्याची चर्चा आहे. याबरोबरच, निवडणुकीत कोण बाजी मारणार किंवा कुणाला पराभवाचा सामना करावा लागणार यासाठी शिर्डी व राहाता शहरातील चौकी-चौकात व कट्ट्यांवर गप्पांच्या मैफिलीत अनेकांनी 21 डिसेंबरला मतमोजणी दरम्यान काय होणार यावर पैज लावल्याचे बोलले जात आहे.
दोन डिसेंबर रोजी राहाता व शिर्डी या दोन्ही नगरपरिषदेच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीने मतदान झाले. तसेच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कोणाच्या पारड्यात भरभरून मत दिले याबाबतचे गणित अनेकांना उलगडले नाही. दोन्ही नगरपरिषदेतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने विजयी किंवा पराभूत होणारा उमेदवार अत्यंत कमी मतांच्या फरकाने निवडून येईल, असा अंदाज तज्ज्ञ राजकारणी यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. मतमोजणीसाठी 21 डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागल्याने निवडणुकीच्या रिंगणात भविष्य आजमावत असलेल्या भावी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना 21 डिसेंबरचा दिवस लवकर येईल, याची चिंता जाणवत आहे.
तसेच, आपला मित्र किंवा समर्थक या निवडणुकीत नक्की जिंकेल, त्याला किती मते मिळतील, तसेच त्याच्या प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला किती मते मिळू शकतील, या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवून देण्यासाठी कोणी प्रामाणिक काम केले किंवा कोणी गद्दारी केली, तर प्रतिस्पर्धी असलेल्या इतर उमेदवारांना किती मते मिळतील, अपक्ष उमेदवारांचा कुणाला फायदा होईल किंवा कोणाला नुकसान होईल, असे तर्क-वितर्क शिर्डी व राहाता शहरात विविध ठिकाणी कट्ट्यावर व चौक-चौकात सुरू आहेत. तसेच, निवडणुकीत कोणता उमेदवार विजयी होणार व कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार यावर देखील अनेकांनी पैज लावल्याचे बोलले जात आहे.
निवडणुकीच्या निकालाला आता फक्त दहा दिवस शिल्लक राहिल्याने, निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांनी मतदान झाल्यानंतर लगेचच दुसर्या दिवसापासून आपण या निवडणुकीत बाजी मारू का यासाठी ज्योतिषांकडे जाऊन आपले राजकीय भविष्य कसे असेल याबाबत अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, निवडणुकीत आपल्याला यश मिळावे म्हणून या दोन्ही शहरांतील अनेक भावी नगरसेवकांनी विविध राज्यांतील धार्मिकस्थळी जाऊन देव-देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी धाव घेतल्याची चर्चा आहे. असे असले तरी, 21 डिसेंबरला मतमोजणीत मतदारांनी कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात विजयी माळ घातली याचे चित्र स्पष्ट होणार असून, तोपर्यंत निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवार व त्यांचे समर्थकांच्या मनात मतमोजणी होईपर्यंत धाकधूक कायम राहणार हे मात्र नक्की आहे.





