Saturday, September 14, 2024
Homeनगरमंत्रालयातील आजच्या बैठकीकडे मनपा कर्मचार्‍यांचे लक्ष

मंत्रालयातील आजच्या बैठकीकडे मनपा कर्मचार्‍यांचे लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सातवा वेतन आयोगासह वारसा हक्काने नोकरी व मनपातील रिक्त जागांची भरती यासंदर्भात आज (मंगळवारी) मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार असल्याने या बैठकीतील निर्णयांकडे महापालिका कर्मचारी व कामगारांसह प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

सातवा वेतन आयोग मिळावा, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांना वारसा हक्काने नोकरी मिळावी या मागण्यांसाठी मनपा कामगार संघटनेने मागच्या आठवड्यात तीन दिवस नगर ते मुंबई लाँग मार्च काढला. आमदार संग्राम जगताप यांनी मध्यस्थी करीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबईत बैठकीचे नियोजन केले. त्यामुळे कामगार संघटनेने लाँग मार्च स्थगित केला.

उद्याच्या बैठकीस नगरमधून आ. जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, आयुक्त डॉ. पंकज जावळे तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, उपाध्यक्ष बाबासाहेब मुदगल आदी उपस्थित राहणार आहेत. सातवा वेतन आयोग व वारसा हक्काने नोकरीसह मनपातील रिक्त जागांची भरती अशा तीन विषयांवर चर्चा व निर्णय या बैठकीत होणार आहे. मात्र, सातवा वेतन आयोग व कर्मचारी भरती याला मनपाचा वाढता प्रशासकीय खर्च अडचणीचा आहे. 70 टक्क्यावरील हा खर्च 35 ते 40 टक्क्यावर आणण्याचे बंधन आहे. तसेच वारसा हक्क नोकरीबाबत खंडपीठात याचिका दाखल असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बैठकीत काय होते, याची उत्सुकता मनपामध्ये आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या